घरमहाराष्ट्रमुंबईत पावसाची रिपरिप सुरू; अलर्ट मात्र टळला

मुंबईत पावसाची रिपरिप सुरू; अलर्ट मात्र टळला

Subscribe

समुद्राला असलेली मोठ्या उंचीची भरती आणि त्यातच सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांच्या मनात भीतीचे काहूर माजले होते. परंतू अधूनमधून विश्रांती घेत मुसळधार पावसाची बरसात होत असल्याने ही भीती काहीशी दूर झाली. त्यामुळे दिवसभर रिपरिप पडणाऱ्या पावसाने हिंदमाता, शीव, धारावी, वडाळा, माटुंगा, काळाचौकी, भायखळा, चेंबूर अंधेरी सब वेआदी भागांमध्ये पाणी तुंबण्याची घटना घडल्या. त्यामुळे तसेच पावसाच्या संततधारेमुळे रस्त्यांवरील वाहतूक संथगतीने सुरु होती. परिणामी अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी पहायला मिळत होती.

मुंबईत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने ६६ मि.मी व सांताक्रुझ वेधशाळेने १११.४ मि.मी एवढ्या पावसाची नोंद केली. तर शहरात ८१.९१ मि.मी, पूर्व उपनगरांत ८२.६९ मि.मी आणि पश्चिम उपनगरांत ८८.६७ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांमध्ये मुंबई शहर व उपनगरांत अतिवृष्ठीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवारी समुद्राला ४.५७ मीटर उंचीची भरती येणार असल्याने तसेच वेधशाळेने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने महापालिकेने आधीच नागरिकांना शक्य असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले होते. तसेच पाणी तुंबण्याच्या ठिकाणी तसेच मिठी नदीच्या परिसरांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत पाण्याचा निचरा करण्यासाठी मनुष्यबळ तैनात केले होते. तर पूर आल्यास स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी निवाऱ्याचीही व्यवस्था केली होती. सकाळी दहा ते अकरा दरम्यान शहरात किरकोळ सरी तर पूर्व उपनगरात चेंबूर आणि पश्चिम उपनगरांत वांद्र्यात प्रत्येकी १४ मि.मी एवढा पाऊस पडला होता. मात्र, त्यानंतर पावसाची रिपरिप सुरु होती. काही भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळत होत्या. तर काही भागांमध्ये अतिजोरदार पाऊस पडत होता. मात्र हा पाऊस अधूनमधून विश्रांती घेत पडत असल्याने मुंबईत दुपारनंतर हिंदमाता वगळता कुठेही पाणी साचण्याचा प्रकार घडलेला नाही.

- Advertisement -

दुपारनंतर कांदिवली, मुलुंड, वरळी, विक्रोळी, धारावी, विलेपार्ले आदी भागांमध्ये अतिजोरदार पावसाच्या सरी अधूनमधून कोसळल्या. लॉकडाऊनमुळे अधीच नागरिक घराबाहेर पडत नाही. त्यातच पावसामुळे लोकांनी घराबाहेर जाण्याचे टाळण्याने अनेक भागांमधील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होते. अनेक दुकाने खुली असली तरी त्यामध्ये ग्राहकही नसल्याने दुकानदारांसह टॅक्सी व रिक्षा चालकांनाही रिकामे बसण्याची वेळ आली होती. दिवसभरात काही ३२ झाडे पडण्याची घटना घडल्या आहे. तर काही ठिकाणी शॉर्ट सर्कीट १० आणि तसेच घरांच्या भिंती आणि स्लॅबचा भाग पडण्याच्या ४ घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणालाही मार लागलेला नसल्याचे आपत्कालिन कक्षाने म्हटले आहे.

- Advertisement -

कोस्टलमुळे तुंबणाऱ्या पाण्याच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष

दक्षिण मुंबईतील ‘शामलदास गांधी मार्ग’ ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’) यांना जोडणारा ९.९८ कि.मी. लांबीचा ‘सागरी किनारा रस्ता’ (कोस्टल रोड) हा बृहन्मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा आणि विविध घटक असलेला देशातील या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम यापूर्वीच सुरु झाले असून येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी कंत्राटदारांच्या स्तरावर घेतली जात आहे. या प्रकल्प कामांमुळे पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास तात्काळ कार्यवाही करण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाच्या सुचनेनुसार संबंधित कंत्राटदारांद्वारे तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरी या तीन ठिकाणांच्या जवळ हे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून नियंत्रण कक्ष बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहेत. तरी ‘कोस्टल रोड’चे बांधकाम सुरु असलेल्या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित नियंत्रण कक्षाकडे किंवा पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या ‘१९१६’ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी. अमरसन्स उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक ०२२–२३६१-०२२१ असा आहे. वरळी डेअरी समोर उभारण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक ०२२–२४९०-०३५९ असा आहे. प्रियदर्शिनी उद्यानाजवळ असणाऱ्या एमएसआरडीसी च्‍या कार्यालयात कार्यान्वित करण्‍यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक ०२२–२३६२-९४१० असा असून यावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी केले आहे.

हेही वाचा –

उपसमितीने घेतला मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या तयारीचा आढावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -