चिमुकल्या हातांनी साकारले शाडूमातीचे आकर्षक गणेश

नाशिक : गेली दोन वर्ष कोविड काळात कोणतेही सण उत्सव साजरे झाले नाहीत. या वर्षी कोविड ओसरल्यामुळे सण, उत्सव साजरे होऊ लागले आहेत. तरीपण सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे आहेच. तसेच प्रदूषण हा एक मोठा प्रश्न संपूर्ण जगासमोर आहे. गणपती उत्सवात प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती व निर्माल्य नदीमध्ये विसर्जित केल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी प्रदूषित होते.

]ऊर्जा प्रतिष्ठानने 2002 पासूनच या संदर्भात काम सुरू केले आहे. गणपती उत्सवात निर्माल्य मोठ्याप्रमाणात नदीत विसर्जित केले जाते, त्यामुळे सर्वप्रथम निर्माल्य पिशवीचे शहरातील महापालिका शाळांमध्ये वाटप करून निर्माल्य संकलन केले गेले. गणपती विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्ती विसर्जित न करता संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले, त्याला नाशिकरांनी मोठा प्रतिसाद देऊन हजारो गणेश मूर्ती विसर्जित न करता संकलित करण्यात आल्या. या उपक्रमाची सुरवात सर्वप्रथम ऊर्जा प्रतिष्ठानने नाशिक शहरात केली.

परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पर्याय म्हणून शाडू मातीच्या गणेश मूर्ती घरोघरी बसवण्याचे आवाहन करण्यात आले. याची सुरवात शहरातील मनपा शाळांमध्ये शाडूमाती पासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आल्या. नदीचे स्वरक्षण तिचे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाय योजना कराव्या याचे मार्गदर्शन करण्यात आले. आपली गोदावरी स्वच्छ ठेवायची असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरातून आपल्या लहान मुलांपासूनच करावी लागेल याचे महत्व पटवून देण्यात आले. आज मुलांचा आणि मातीचा संपर्क तुटला आहे, मुलं मातीतले खेळ विसरले आहेत, त्यांची आणि मातीची नाळ जोडण्यासाठी अश्या कार्यशाळा हा त्यापैकी एक मार्ग आहे.

म्हणूनच कोरोना काळानंतर पुन्हा एकदा ऊर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी शाडूमातीपासून गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेण्यास सुरूवात केली आहे. रविवारी (दि. ७) पंडित कॉलनी येथील बालगणेश उद्यान येथे कार्यशाळा घेण्यात आली. नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार प्रसन्ना तांबट, संग्रामसिंग राजपूत, निलेश शिर्के, सचिन शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी मुलांना गणेश मूर्ती कश्या बनवायच्या या बद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवले. या कार्यशाळेसाठी ऊर्जा प्रतिष्ठानचे आनंद फरताळे, जगदीश शेजवळ, हर्षल केंगे, दिपक हांडगे, संजय घोडके, रोशन शिंदे, पंकज सोळंकी, राहुल लोया, स्वप्नील घुमरे, हेमंत दळवी, विवेक जावंजाळे, हर्षल पाटील, समीर देवघरे, कुणाल पोतदार यांचे सहकार्य लाभले.

या कार्यशाळेंच्या माध्यमातून मुलांना स्वतः मूर्ती बनवण्याची गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेश मूर्ती बनवल्या. मूर्तीला कलर कसा करावा याचे देखील मार्गदर्शन करण्यात आले. आज बहुतेक घरात शाडू मातीच्या गणेश मूर्ती विद्यार्थी स्वतः बनवून बसवतात. विसर्जनाच्या दिवशी घरीच मूर्ती विसर्जित करतात. प्रत्येकाने याच पद्धतीने सर्वांनी शाडूमतीच्या मूर्ती बसवून घराच्या घरी विसर्जित केल्या तर गोदावरीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल, नदीचे स्वरक्षण होण्यास मदत होईल असे आवाहन ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी केले आहे.