Cruise Drug Bust: शाहरूख खान NCB चे पुढचे टार्गेट – नवाब मलिक

Nawab-Malik-Shahrukh khan

भाजपचे लोक आधी सांगून तपास यंत्रणांच्या कारवाया होतात. याहून अधिक पुराव्यांची गरज नाही. भाजपचे लोक एनसीबीचे अधिकारी म्हणून लोकांना घेऊन जातात. तसेच एनसीबीचे लोक सरकारी साक्षीदार असल्याचे म्हणून सांगतात, म्हणजे कायद्याचे राज्य आहे की नाही, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आयटी विभागाने टाकलेल्या धाडींना आम्ही घाबरत नाही, असे उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले. कितीही भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही घाबरणार नाही, असेही ते म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयटीच्या धाडीनंतर नवाब मलिक बोलत होते. एनसीबीचे पुढचे टार्गेट हे शाहरूख खान असणार आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. (Shahrukh khan is NCB’s next target says nawab malik after bjp connection in drugs case)

दीपिका पदुकोण, अर्जुन रामपाल, कॉमेडियन भारती, रिया चक्रवर्ती अशा अनेक सेलिब्रिटींना बोलावून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बसवून ठेवले. आता यापुढचे टार्गेट हे शाहरूख खान आहे. महिन्याभरापासून ही बातमी फिरत आहे. त्याच्या मुलाला गोव्यावरून आल्यानंतर अडकवण्यात आले आहे. एनसीबी आणि भाजपच्या संगनमताने बॉलिवुडला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. बऱ्याचशा लोकांच्या मनात निर्माण करून पैसे काढण्याचे हे उद्योग आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजपचे पदाधिकारी एनसीबीसोबत धाडी टाकतात ही गोष्ट म्हणजे भाजपच्या इशाऱ्यावर या कारवाया होत असल्याचे दिसून आले आहे. सामान्य कार्यकर्ते म्हणवणारा मनिष भानुशाली हा केंद्रीय मंत्र्यांसोबत कसा दिसतो ? माध्यमांना प्रतिक्रिया देतो ? हे सगळे अधिकारी कोणी दिले ? एकुण एनसीबी भाजपच्या इशाऱ्यावरून बॉलिवुडला बदनाम करत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. सगळेच पुरावे एकाच दिवशी सादर करणार नाही. जसजसे दिवस पुढे जातील मी पुरावे सादर करेन. कस्टममधून कोणत्या अधिकाऱ्यांना एनसीबीमध्ये आणून बसवले, कुणाचे नाते कुणाशी आहे ? कुणाच्या घरी लॉबिंग झाली ? कुणाच्या बोलण्यावरून या कारवाया होत आहेत ? कोण भाजपची लोक मध्यस्तीने पैसे काढत आहे, याचा योग्यवेळी मी खुलासा करणार आहे.

एनसीबीने कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केल्याच्या भूमिकेवरही नवाब मलिक यांनी टीका केली. एखाद्या छाप्या दरम्यान कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीचा ताबा हा दुसऱ्याकडे देऊ शकत नाही. परवानगीशिवाय अशी गोष्ट करणे म्हणजे बेकायदेशीर कारवाई असल्याचेही ते म्हणाले. या एनसीबीच्या कायद्याचे उल्लंघन स्पष्टपणे झाले आहे. एखाद्या निष्पक्ष सरकारने अशा अधिकाऱ्यांविरोधात आतापर्यंत कारवाई केली असती. कोर्टात जाण्याचा खुलासा करून भाजपचे लोक लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत.


हेही वाचा – Cruise Drug Bust: गोसावी, भानुशालीने कारवाईत साक्षीदार म्हणून मदत केली, आमच्यावरील आरोप बिनबुडाचे – NCB