कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल (ता. 25 ऑगस्ट) कोल्हापुरातील दसरा मैदानात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आता 82 व्या वर्षी शरद पवार यांनी पक्षाला नव्याने उभारणी देण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी आता शरद पवार पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी जाहीर सभा घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून शरद पवारांनी आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून त्यांच्या नेतृत्वातील तिसरी सभा ही काल कोल्हापुरात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज विराजमान होते. त्यामुळे आता शाहू महाराज हे राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. (Shahu Maharaj Chhatrapati NCP candidate from Kolhapur? Information given by Sharad Pawar)
हेही वाचा – ‘भारत जोडो यात्रे’मुळे विरोधकांची स्थिती सुधारली, शरद पवारांकडून राहुल गांधींचे कौतुक
शाहू महाराज हे सर्वमान्य नेते आहेत, ते एक अराजकीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे ते आगामी लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असू शकतात? असा प्रश्न यावेळी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारण्यात आला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, शाहू महाराजांनी सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले यामुळे आनंदाचा धक्का बसला. त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर त्यांचे आणि जयंत पाटील यांचे काय बोलणे झाले हे माहीत नाही. पण त्यानंतर थेट ते बोलायलाच उभे राहिले, त्यामुळे पाटलांनी त्यांना काय मार्गदर्शन केले, हे माहीत नाही.
मला असे वाटले होते की ते दोन शब्द बोलतील. पण ते सविस्तरपणे बोलले. त्यांनी एकंदर परिस्थितीचे विश्लेषण केले. त्यांनी पक्षांतर करण्याची जी प्रवृत्ती आहे, त्यासंबंधीचे मत व्यक्त केले. जवळपास काल शाहू महाराजांनी त्यांच्या भाषणातून विरोधकांना दिशा दाखवली. त्यामुळे त्यांचे आभारी तर आहोतच. पण काल ते आले त्यामुळे आम्ही आनंद झाला आणि येऊन त्यांनी भाषण केले यामुळे आनंद द्विगुणीत झाले, असेही पवार यावेळी म्हणाले.
गेली 50 वर्ष कोल्हापुरात येतो. या कुटुंबियांशी माझा संबंध आहे. सामान्य जीवनात कोल्हापुरकरांच्या समस्यांबाबत ते बोलतात. पण राजकीय भूमिका एवढ्या वर्षात कधी त्यांनी मांडली नव्हती. पण त्यांनी आता ही राजकीय भूमिका घेऊन विरोधकांचे मनोबल वाढवले, असे पवारांकडून सांगण्यात आले. तर शाहू महाराज हे निवडणूक लढवणार का? या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, उद्या जर का लोकांच्या इच्छेचा सन्मान करण्याची भूमिका त्यांनी घेतली तर आम्ही इथे बसलेले आनंदी होऊ. पण लोकसभा निवडणूक ते लढण्यासाठी इच्छुक नसल्याचे त्यांनी आपल्याला सांगितले आहे, असेही शरद पवार यांच्याकडू स्पष्ट करण्यात आले.