घरमहाराष्ट्र‘अपक्ष’ हा फडणवीसांचा डाव

‘अपक्ष’ हा फडणवीसांचा डाव

Subscribe

श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा खळबळजनक गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीराजेंनी अपक्ष लढावे, ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खेळी असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी शनिवारी केला.

कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. तसेच यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान अनेक धक्कादायक आरोप केले. ते म्हणाले की, छत्रपती संभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांचे विविध विषयांवर बोलणे झाले. संभाजीराजेंना अपक्ष लढण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने भाग पाडले. बहुजन मतांचे विभाजन व्हावे यासाठी भाजपने ही खेळी खेळली, असा आरोपही शाहू छत्रपती यांनी केला.

- Advertisement -

संभाजीराजेंना उमेदवारी न देऊन शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, अशी टीका विरोधक करीत आहेत. विरोधकांच्या या टीकेलाही छत्रपती शाहूंनी उत्तर दिले. ते म्हणाले की, संभाजीराजेंना उमेदवारी दिली नाही म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान केला असे होत नाही. संभाजीराजेंची ती राजकीय भूमिका होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, असे म्हणणेही योग्य नाही. आतापर्यंत सगळ्यांनीच छत्रपती घराण्याचा सन्मान केला आहे. उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात झालेला ड्राफ्ट कच्चा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेतला, असे म्हणता येणार नाही. शिवसेनेने मान राखला नाही असे बोलणे चुकीचे आहे. संभाजीराजेंना अपक्ष उभे राहायचे असेल तर इतरांना भेटणे गरजेेचे होते, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्वत:च्या बळावर पुढे जाणे किंवा इतर पक्षांचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय संभाजीराजेंकडे होते. मागील वेळी राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेतानाही आम्ही त्यांना ती घेऊ नये, असे मत मांडले होते, परंतु त्यांनी वैयक्तिक तो निर्णय घेतला. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी जी राजकीय पावले उचलली त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी चर्चा केली नाही. यात छत्रपती घराणे कुठे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे, असे म्हणता येणार नाही, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले. कोल्हापुरातून संजय पवार यांना उमेदवारी मिळाल्याचे समजताच मी त्यांना फोन केला. त्यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असेही शाहू महाराजांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर शुक्रवारी यातून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर यावेळी संभाजीराजे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला. सगळे काही ठरलेले असताना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असे म्हणत आपल्या माघारीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले होते, परंतु याप्रकरणी श्रीमंत शाहू महाराज यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर या प्रकरणाकडे आश्चर्याने पाहिले जात आहे.

मी म्हणतो तेच सत्य – संभाजीराजे
श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या या सगळ्या गौप्यस्फोटानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, असे म्हणत संभाजीराजेंनी या राजकीय वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या वडिलांच्या गौप्यस्फोटावर संभाजीराजे काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर त्यांनी ट्विट करीत आपण आपल्या शब्दावर ठाम असल्याचे सांगितले.

शाहू घराण्याने सत्याची कास सोडली नसल्याचे सिद्ध

कोल्हापूरच्या मातीमध्ये सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्याने सत्याची कास सोडली नाही हेदेखील सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या सर्व प्रकारानंतर दिली. ते म्हणाले की, शिवसेनेने कधीही कुणाची फसवणूक केली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जी काल विधाने केलेली आहेत की आम्ही ठरवून कोंडी केली ती विधाने खोटी होती, हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विधानातून स्पष्ट झाले, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -