मुंबई : मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करून त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून करण्या आला आहे. ज्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला त्यांचा स्पष्ट विरोध असल्याचे दिसून आले आहे. ज्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आता आरक्षणावरून वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, या वादात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उडी घेतली आहे. भुजबळांनी केलेले वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारे असून भडक वक्तव्य करण्याची भुजबळांना जुनी सवय असल्याची टीका देसाई यांनी केली आहे. (Shambhuraj Desai got angry with Chhagan Bhujbal over the reservation issue)
हेही वाचा – मराठा समाजाच्या पोरांना अडकवण्याचे काही नेत्यांचे षडयंत्र; मनोज जरांगेंचा आरोप
काल (ता. 06 नोव्हेंबर) सोमवारी छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपांमुळे आणि मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्यांमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी केलेल्या विधानांवर आता शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भुजबळांनी केलेल्या वक्तव्यांवर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय हा मंत्रिमंडळाने ठरवलेला आहे. तर कुणबी प्रमाणपत्र जे देण्याचा निर्णय घेतला आहे, तो निर्णय मनात आला म्हणून घेण्यात आलेला नाही तर कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती ही मंत्रिमंडळात निश्चित झाली आहे. न्यायाधीश शिंदे यांच्या समितीने त्याची नियमावली, फॉरमॅट आणि कार्यपद्धती ही निश्चित केली आहे. त्यामध्ये ठरले गेले की, ज्या कोणाच्या वडिलांची, आजोबांची, खापरपंजोबांची कुणबी अशी नोंद सापडली आहे, म्हणजेच कधीकाळी त्यांना ते आरक्षण लागू होते, परंतु काही कारणास्तव नंतर त्यांनी ते आरक्षण घेतले नाही, अशा संदर्भातील काही कागदपत्रे सापडली तरच त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण चर्चा ही मंत्रिमंडळात झाली आहे. त्यामुळे असे काही नाही की कोणाच्यातरी मनात आले म्हणून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे देसाई यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
आम्हाला ओबीसी किंवा इतर कोणाचे तरी आरक्षण काढून मराठ्यांना द्यायचे आहे, असे अजिबात नाही. त्यामुळे विनाकारण भूजबळांनी अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो चुकीचा आहे. कदाचित उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीआधी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांसमोर भूमिका स्पष्टपणे मांडणार आहोत. छगन भुजबळ यांचे हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारे आहे. त्यामुळे आता असे वाटायला लागले आहे की, जे होणारच नाही ते भासवायचे आणि मग मी काय तरी केले आणि तुमचं जे जात होते ते माझ्यामुळे थांबले असा काही भुजबळांचा प्रयत्न आहे का? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे, असे शंभूराज देसाई यांच्याकडून सांगण्यात आले.
तसेच, मराठा आरक्षणासारखा मोठा विषय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी हाताळलेला असताना, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येत असताना छगन भुजबळ यांनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करणे हे अयोग्य आहे. त्यामुळे उद्या याबाबतची आमची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालणार आहोत. तर, काल भुजबळ म्हणाले की, निवृत्त न्यायाधीश हे साहेब म्हणत जरांगे यांच्याकडे गेले होते तर असे अजिबात झाले नाही. कायदेशीरबाबी जरांगे यांना समजावून सांगता याव्यात, यासाठी सरकारनेच निवृत्त न्यायाधीशांना त्या ठिकाणी जाण्याची विनंती केली होती आणि त्यानुसार ते तिथे गेले होते. सरकारच्या सांगण्यावरून न्यायाधीश तिथे जातात आणि सरकारमधील एक मंत्री त्यांच्यावर आक्षेप घेतात, हे बरोबर नाही. भडक वक्तव्य करायची त्यांची जुनी सवय आहे, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी भुजबळांच्या वक्तव्यांवर संताप व्यक्त केला आहे.