Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरे 'सामना' सोडल्यास दुसऱ्या चॅनलला मुलाखत का देत नाही? शंभूराज देसाईंचा...

उद्धव ठाकरे ‘सामना’ सोडल्यास दुसऱ्या चॅनलला मुलाखत का देत नाही? शंभूराज देसाईंचा सवाल 

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्ट माध्यमातून सामनाला मुलाखत दिली. उद्धव ठाकरे यांची मुलाखत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपासह शिंदे गटावर जोरदार टीका केली. दरम्यान, उद्धव ठाकरे ‘सामना’ सोडल्यास दुसऱ्या चॅनलला मुलाखत का देत नाही? असा सवाल शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला.

मंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सामना सोडलं तर वन टू वन मुलाखत दुसऱ्या कुठल्या चॅनेलवर उद्धव ठाकरेंची झाली आहे का? खासदार संजय राऊत प्रश्न विचारतात आणि उद्धव ठाकरे उत्तरं देतात. म्हणजे अगोदर प्रश्न पत्रिका फुटली आणि मग उत्तर आपण दिली. असा त्याचा अर्थ होतो. राष्ट्रीय, राज्य आणि इतर चॅनेलसोबत ते चर्चा का करीत नाहीत. उद्धव ठाकरेंवर बोलण्याइतका मी काही मोठा नाही. मला एवढेच बोलायचे आहे की, वर्ष झालं तरी त्याच त्याच गोष्टी उद्धव ठाकरे बोलताहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्याकडे फारश्या गांभीर्यानं पाहिल असं मला वाटत नाही.

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. येत्या दोन दिवसांमध्ये हा आठवडाही संपेल. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे फक्त एका दिवसासाठी विधानपरिषदेत आले. त्या एक दिवसामध्ये त्यांनी विरोधी पक्षाची प्रखरपणे भूमिका बजावली नाही. सरकारचं काही चुकत असेल तर त्यावर त्यांनी काहीतरी मत मांडायला पाहिजे होते. सरकारचं काही गोष्टींकडे लक्ष वेधायला पाहिजे होतं. काही चांगल्या सूचना राज्याच्या दृष्टीने काय करायला पाहिजे? यावर भूमिका मांडणं गरजेचं होतं. पण आज वर्ष झालं तरी तेच तेच उद्धव ठाकरे बोलताहेत. आम्ही सुद्धा बराच काळ त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. मात्र, उद्धव ठाकरेंकडून काही महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत. त्यांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून राज्य सरकारला काही सूचना केल्या पाहिजेत. काही गोष्टी राज्य सरकारसमोर ठेवल्या पाहिजेत. पण तसं काही त्यांच्या मुलाखतीत दिसत नाही, असंही शंभूराज देसाई म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात. तरीदेखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं, हे आपल्याच सोबत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.


हेही वाचा : ‘मी खंजीर खुपसलाय म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं?’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल