Homeमहाराष्ट्रShambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरून शंभुराज देसाईंचा राऊतांना इशारा, म्हणाले...

Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरून शंभुराज देसाईंचा राऊतांना इशारा, म्हणाले…

Subscribe

सातारा : गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांकडून वैयक्तिरीत्या या फोटोंबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण राऊतांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या आरोपांना आता शिवसनेचे नेते आणि सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांनी ते जामिनावर बाहेर असल्याचे लक्षात ठेवावे, असा इशाराच देसाईंकडून देण्यात आला आहे. (Shambhuraj Desai warning to Sanjay Raut on his criticism of CM Eknath Shinde)

हेही वाचा… Sanjay Nirupam : ‘त्यांच्या’ तक्रारींची दखल घेतली असती तर…; निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट

कराड येथे मंत्री शंभूराज देसाई यांना प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांबाबत विचारले. त्यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात २४ बाय ७ कार्यरत आहोत. त्यामुळे नाहक, बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही. संजय राऊतांची अजून निर्दोष मुक्तता झालेली नाही. त्यांचे कोणाशी संबंध आहेत. कोणत्या पुण्यकर्मासाठी ते आत जाऊन आले, याचे उत्तर त्यांनी आधी द्या, नंतरच मुख्यमंत्र्यांवर बोला, असे आव्हान शंभुराज देसाई यांच्याकडून करण्यात आले आहे.

तर, खासदार संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने पहात नसून दुर्लक्षच करतो, गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्ड) कोणाचे संबंध आहेत आणि शंभर दिवस ते कोणत्या पुण्यकर्मासाठी कारागृहात जाऊन आले. याचा खुलासा त्यांनी आधी करावा. तसेच जामिनावर बाहेर असल्याचे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सूचक इशारा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांना दिला आहे. तसेच, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या साताऱ्यातील उमेदवारीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीन नेते एकत्र बसून राज्यातील उमेदवारीचा निर्णय घेतील. शिवसेनेच्या जागा वाटपाचे निर्णय एकनाथ शिंदेच घेणार असून, ते सांगतील, त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण त्याची काटेकोर अंमलबजावणी करू, असा ठाम विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.