ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते – शंकरराव गडाख

गडाख यांनी आज अहमदनगरमध्ये जाहीर भाषण केले. यावेळी ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते, असे ते म्हणाले.

shankarrao gadakh
शंकरराव गडाख

एकनाथ शिंदेंच्या बडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली आहे. तब्बल 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. उरलेले 15 आमदार सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. यात अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांचा समावेश आहे. यावर गडाख यांनी आज अहमदनगरमध्ये जाहीर भाषण केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कैतुक करताना राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते, असे वक्तव्य केले.

उद्धवसाहेब हे अजिबात राजकीय व्यक्ती नाहीत. शिवसेना ही अतिशय जहाल संघटना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या रक्तात एक वेगळी ताकद आणि रग निर्माण केली आहे. असे बंड होत असताना शिवसेनेसारखा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हाती होता. राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते. मात्र, या माणसाने स्वत: कमीपणा घेऊन हे सगळे थांबवले. त्यांनी संयमाने भूमिका घेतल्याने पुढे काय झाले ते आपण सगळ्यांनीच पाहिले असल्याचे शंकरराव गडाख म्हणाले.

मनात प्रचंड घालमेल सुरू होती –

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आजपर्यंत आपण गोव्यात असे झाले, तिकडे तसे झाले हे ऐकत होतो. मात्र, आपल्या राज्यातही तीच परिस्थिती आली. प्रचंड घालमेल मनात सुरु होती. काय निर्णय घ्यावा कळत नव्हते. मी यशवंतराव गडाख यांचा मुलगा असलो तरी माझ्या वाट्याला कायम संघर्ष आला. मी अपक्ष निवडून आलो तेव्हा तालुक्याच्या हिताचा निर्णय घेईन असे सांगितलं होते. उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिली. ते राजकीय व्यक्ती नव्हते म्हणून मला संधी दिली. हा तालुका भल्या भल्यांना घरी बसवणारा तालुका आहे. भावनिकतेवर चालणारा तालुका आहे,असे  गडाख म्हणाले.

मलाही गुवाहाटीवरुन फोन आला, पण… –

मला काही आमदारांनी सांगितलं होतं हे सरकार जास्त टिकणार नाही. कारण, ज्यांच्यासोबत लढलो त्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसावे लागले, अखेर स्फोट झाला. मलाही गुवाहाटीवरुन फोन आला होता, अनेक आमदार येणार आहेत तु्म्ही देखील या. त्यावेळी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम काय होईल तो होईल. त्यावेळी गडाखसाहेब उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन बोलले. शेवटच्या कॅबिनेटमध्ये आदित्य ठाकरे आणि मी आम्ही दोघेच होतो. सर्व घडामोडी सुरु होत्या, मात्र आपण स्थिर होतो, असंही शंकरराव गडाख यांनी सांगितलं.