घरताज्या घडामोडीदेशामध्ये धर्माच्या नावावर नागरिकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा आरोप

देशामध्ये धर्माच्या नावावर नागरिकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा आरोप

Subscribe

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिपण्णी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळतंय. त्याचा परिणाम लोकांमध्येही एकप्रकारची अस्वस्थता आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगली – शिराळा येथील शेतकरी मेळाव्यात केले.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद ही त्या काळातील नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्य उभे करण्यासाठी कष्ट केले आणि नंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले असेही शरद पवार म्हणाले. आज देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला जातंय आणि राज्य वेगळ्या विचारांच्या लोकांच्या हातात आहे. हा शिराळा तालुका आणि या सांगली – सातारा जिल्ह्यामधून कर्तृत्ववान नेतृत्वाची मालिका होऊन गेली. ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू व अशी अनेक नावं आहेत. अशी अनेक कर्तृत्ववान माणसे तयार झाली त्यांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील यादृष्टीने काम केले. या नेत्यांनी विकासाचं व माणसं जोडण्याचं राजकारण केलं. आज मात्र देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले जात आहे असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्रासुध्दा गेल्या दोन वर्षांत एका वेगळ्या विचाराचे राज्य आलं. जे पूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. देशाला हेच चित्र दिसलं या सगळ्या कालखंडात सामाजिक ऐक्य या गोष्टी संबंधी वेगळी भूमिका मांडली गेली असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. काल परवा भाजपशासित कर्नाटक राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून मालाची खरेदी करू नका, अशा प्रकारचा फतवा काही संघटनानी काढला. शेवटी व्यवसाय करायचा असेल तर दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुसंख्याक करु शकतो त्याचा व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल, माल चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे. परंतु हा या जातीचा, हा या धर्माचा म्हणून तिथे मालच घेऊ नका याप्रकारची कटुता निर्माण करायचे काम जर राज्य हातामध्ये असलेले घटक करू लागले, तर देश पुढे कसा जाईल? सामाजिक आणि राजकीय ऐक्य कसं ठेवायचं हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे.आज या धर्मांध वृत्तीच्या विरोधात सुध्दा एकप्रकारची लढाई आपल्याला लढायची आहे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

जे राजकारण करायचे आहे ते राजकारण समाजाच्या हिताचे विकासाचे, शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटेल, शेती संपन्न कशी होईल, कामगाराला त्याच्या घामाची किंमत कशी मिळेल, समाजातील उपेक्षित वर्ग आहे तो सन्मानाने कसा जगेल यावर आधारीत राजकारणाची आवश्यकता आहे. मला आनंद आहे त्या आधारावर उध्दव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील या सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नाने महाराष्ट्राचे हे चित्र बदलायचा निर्धार आज आपण केलेला आहे. त्यामध्ये यश तुमच्या पाठिंब्याने मिळेल अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

महाराष्ट्राची गुढी जी राष्ट्रवादीच्या माध्यमातून उभी केलीयं, ती भक्कम आणि शक्तीशाली कशी राहील आणि त्यासाठी हातभार लावणाऱ्यांचे स्वागत करण्याच्या हेतूने आज आपण या ठिकाणी जमलो आहोत असे भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार म्हणाले. शिराळा या मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर योग्य असेल त्यासाठी पडेल ती भूमिका घेणारा असा इतिहास या मतदारसंघाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा – सांगली जिल्हा एक असताना विशेषत: या शिराळा तालुक्याचे एक आगळंवेगळं योगदान आहे. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य इतिहासामध्ये या भागातील स्वांतत्र्यसैनिकांचे योगदान खूप मोठे आहे. याच भागातून कर्तृत्ववान नेत्यांनी राज्याच्या, जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या हितासाठी काही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत असेही शरद पवार म्हणाले.

शिवाजीराव नाईक हे एक यशस्वी जिल्हा परिषद अध्यक्ष होते.त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीमुळेच त्यांना देशपातळीच्या राजकारणात पाठवायचा निकाल त्यावेळच्या राज्यसरकारने केला. सहकार, पंचायत राज, शैक्षणिक, कृषी व औद्योगिक क्षेत्रात त्यांना जितकं करता येईल तेवढं करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आज ते पुन्हा एकदा स्वगृही परत येत आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो. मी जयंतराव पाटील यांना विनंती करतो की, आपण एकदा शिवाजीरावांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्य कारभारासाठी कसा होईल, यावर चर्चा करू. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा व अनुभवाचा आपल्याला राज्यपातळीवर नक्कीच फायदा होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

एकेकाळी या भागात पाणी प्रश्नावर संघर्षाची भूमिका घेतली जायची. विविध योजन्यांच्या मागणीवरूनसुद्धा या भागात संघर्ष झाले होते. पाण्यासाठी तहानलेली शेती ही समस्या या भागात फार मोठ्या प्रमाणात होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपण सगळ्यांच्या प्रयत्नांनी बऱ्याचशा प्रश्नांची सोडवणूक या भागात झालेली आहे. मला आनंद आहे की, आजच्या या सभेमध्ये जयंतराव पाटील यांनी जवळपास ६५४ कोटी रूपये येथील योजनांच्या पूर्ततेसाठी देण्याचे जाहीर केले. येत्या चार – पाच वर्षांमध्ये या भागात एखाद दुसरं गाव तहानलेलं असेल असं चित्र अजिबात दिसणार नाही अशी खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

मानसिंगराव नाईक व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेले चिकाटीचे प्रयत्न व जयंतराव पाटील यांनी साथ दिली, याचा मनापासून आनंद शरद पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. सध्या ऊस शेती इतक्या प्रमाणात वाढते आहे की गळीत कसा करायचा हा प्रश्न आहे. मी सहकारमंत्र्यांना सारखं विचारत असतो की, हे कारखाने किती दिवस चालणार? १०० टक्के ऊस जाणार की नाही? नुकतंच त्यांनी मला समस्त राज्याचा आढावा दिला, त्यानुसार असे चित्र दिसते आहे की, जवळपास ९० पेक्षाहून अधिक कारखाने हे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील. ही स्थिती आहे. पाणी आणि वावर दिसलं की तुम्ही कांदे लावल्याशिवाय राहत नाही, दुसऱ्या पिकाचा विचार करत नाही. शेवटी दोन पैसे खात्रीने देणारं पिक म्हणून आपण ऊसाचा विचार करतो मात्र आता आपल्याला काहीतरी दुसरा विचार करावा लागेल. साखर एके साखर करताना दुसरा विचार करावा लागेल. मला आनंद आहे की मानसिंगराव नाईक यांनी इथल्या कारखान्यातून इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला. आज ब्राझील व अमेरिकेसारख्या देशामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित केले जाते. वाहने चालतात. ज्यामुळे त्या देशाचं परकीय चलन वाचतं. आपल्यालाही तसा विचार करावा लागेल असा विश्वास शरद पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

साखरेवर समाधान मानून चालणार नाही. आज साखर तुम्ही तयार केली की, वर्षभर साखर गोडाऊनमध्ये ठेवता. त्या साखरेवर कर्ज घेता ते कर्ज घेऊन शेतकऱ्यांना भाव देता आणि त्याच्या ऊसाची किंमत दिल्यानंतर वर्ष – दीड वर्षानी ती साखर विकता. त्या कर्जाचे व्याज हे तुमच्या डोक्यावर येते आणि त्याचा परिणाम तुमच्या किंमतीवर होतो आणि यासाठी वेगळा विचार हाच करावा लागेल अन्य पदार्थ काय तयार करता येतील आणि म्हणून त्यादृष्टीने विचार याठिकाणी होतोय याचा मला आनंद आहे असेही शरद पवार म्हणाले.

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी आपले विचार मांडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मानसिंगराव नाईक, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव, आमदार अरुण लाड, युवक नेते विराज नाईक आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचा : महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -