पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडल्यानंतर काका-पुतण्याच्या नात्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे क्वचितच हे दोघे एकत्र पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे आजारी असल्याकारणामुळे घरी राहून आराम करत आहेत. डेंग्यूमुळे अजित पवारांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे आज (ता. 10 नोव्हेंबर) शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने तरी अजित पवार हे पुण्यातील कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होतात की नाही? यांकडे सगळ्यांचे लक्ष होते. पुण्यात दिवाळी स्नेहभोजनाच्या निमित्ताने देखील पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले होते. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील त्याठिकाणी उपस्थित होत्या. पण अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. (Sharad Pawar, Ajit Pawar came together, what exactly happened at Prataprao Pawar’s house?)
हेही वाचा – अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर मृतांसह अल्पवयीन मुलांचीही नावं; आव्हाडांचे आरोप
पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात नेमके काय घडले? याबाबतची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता ही सर्वांनाच होती. मात्र, पवार कुटुंबियांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबत शरद पवार यांची बहिण सरोज पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आजचा दिवस खूप आनंदाचा असतो. नेहमीप्रमाणे सर्वजण एकत्र आले होते. एकमेकांची मजा, मस्करी, गप्पा रंगल्या होत्या, अशी माहिती सरोज पाटील यांच्याकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली.
तर, भाऊबीजेला दरवर्षी पवार कुटुंब एकत्र जमलेले असते. त्यामुळे या भाऊबीजेला पवार कुटुंबीय बारामतीमध्ये एकत्र येणार का? असा प्रश्न प्रसार माध्यमांनी सरोज पाटील यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, बारामतीत कुटुंब एकत्र येणार नाही, मी कोल्हापूरला निघाले आहे. तर अजित पवार यांची प्रकृती आता बरी असल्याची माहिती त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली. आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार हे दोघे बाणेरला प्रतापराव पवारांच्या घरी पोहोचले. परंतु, त्यापूर्वीच काही वेळ आधी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बाणेरला पोहोचले होते. याआधीही शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट झाली होती. परंतु, आज खूप दिवसांनी काका-पुतणे एकत्र भेटले. ज्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या. परंतु, यानंतर लगेच अजित पवार हे दिल्लीच्या दिशेने अमित शहांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.