मातोश्रीवर राजकीय हालचाली; शरद पवार, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं

sensitization at matoshree. Photo - Deepak Salvi

दोन दिवसांपूर्वीच लॉकडाऊन वाढविण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती. त्यानंतर आज पुन्हा शरद पवार मुख्यमंत्र्यांची मातोश्री येथे भेट घेत आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील आहेत. तसेच शिवसेनेचे नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई हे देखील मातोश्रीवर पोहोचले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महा विकास आघाडीमध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यानंतर मागे घेतलेल्या बदल्या. मुख्य सचिव अजोय मेहता यांना पदावरुन हटविल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त करणे, तसेच राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिलेला पक्षप्रवेश यामुळे महाविकास आघाडीत सावळा गोंधळ असल्याचे चित्र निर्माण झाले होते.