मी पुढची निवडणूक… पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राष्ट्रीय पातळीवर मजबूत पकड आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांच्या नावाची चर्चा आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचं नाव आता पंतप्रधान पदासाठी घेतलं जात आहे. परंतु पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पुण्यात बालगंधर्व मंदिर येथे शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली, त्यातून असे नेतृत्व काढू, माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत देणे. मी पुढची निवडणूकच लढवणार नाहीये, मग पंतप्रधान पदाचा संबंधच येत नाही, असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचे एक उदाहरण आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारच्या जागावाटपाची चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मुंबईच्या महानगरपालिकेत कसे जावे याची चर्चा आमच्यात होणार आहे, असं शरद पवार म्हणाले.

मनपाच्या निवडणुका काँग्रेसने स्वतंत्र लढावे आणि इतरांनी स्वतंत्र लढावे, मात्र यामध्ये काही वेगवेगळी मत आहेत. यावरही काही निर्णय झालेला नाही, असंही शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांचा राष्ट्रीय राजकारणात मोठा दबदबा आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठीही त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचंही म्हटलं जातंय.


हेही वाचा : मी माझ्या आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत – जयंत