डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होतील असं म्हणणाऱ्या शरद पवारांचे पुन्हा घूमजाव

महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांनी आता त्यांच्याच वक्तव्याचं घुमजाव केलं आहे. त्यामुळे मध्यावधीचे संकेत त्यांनी धुडकावून लावले आहेत.

ncp leader sharad pawar admitted to mumbai breach candy hospital

सोलापूर – गुजरात आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका लागू शकतात. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी (Mid Term Elections) तयार राहा, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते. महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. मात्र, मध्यावधीचे संकेत त्यांनी धुडकावून लावत त्यांनी त्यांच्याच वक्तव्यावर पुन्हा एकदा घूमजाव केलं आहे.

मध्यावधीबाबत काय बोलले होते पवार?

मुंबईत 3 जुलै रोजी आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले होते की, ‘राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळे तयारी आत्तापासून करा.’

हेही वाचा डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुकीचे शरद पवारांकडून संकेत,आमदारांना तयारी करण्याच्या सूचना

पवारांचं घुमजाव काय?

शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मध्यावधी निवडणुकांविषयही सांगितलं. ते म्हणाले की, “मध्यावधीचे मी भाष्य केले नाही. इतर काही नेत्यांनी केले असावे. मध्यावधी निवडणूक होईल की नाही, याबाबत भाष्य करण्याच्या स्थितीत मी नाही.”

शरद पवारांनी ३ जुलैला मध्यावधी निवडणुकीचे भाकित वर्तविल्यानंतर लगेचच १० जुलै रोजी आपल्या या वक्तव्याबाबत कानावर हात ठेवले होते. ‘मध्यावधी निवडणुका लागतील असे मी म्हणालोच नव्हतो. दोन अडीच वर्षे राहिली आहेत. त्यामुळे तयारीला आतापासून लागले पाहिजे, असे म्हणालो होतो. याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होतील, असा नाही. प्रत्यक्ष निवडणुका येतात, त्याआधी सहा महिने एक वेगळे वातावरण असते. त्यामुळे खरं बघायचं झालं तर, आपल्याकडे फक्त दोन वर्षे आहेत. त्या दोन वर्षांमध्ये आपली पूर्ण तयारी असली पाहिजे. हे लक्षात घेऊन तयारीला लागा हे सूचवलं होतं, अशी सारवासारव शरद पवार यांनी त्यावेळी केली होती.

डिसेंबरपर्यंत राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे सूतोवाच शरद पवारांनी केलं होतं. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातही मध्यावधी निवडणुका होतील, असं शरद पवार म्हणाले होते. डिसेंबरमध्ये गुजरातच्या निवडणुका लागल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातील मध्यावधी निवडणुकीचा दावा त्यांचा फोल ठरल्याने आता त्यांनी आपल्या वक्तव्याचे घुमजाव केले असल्याचं बोललं जात आहे. मध्यावधीचे मी भाष्य केले नाही. इतर काही नेत्यांनी केले असावे. मध्यावधी निवडणूक होईल की नाही, याबाबत भाष्य करण्याच्या स्थितीत मी नाही, असं स्पष्टीकरण आज त्यांनी दिलं आहे.