कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना तुरुंगात जावे लागले. अगदी अशीच काहीशी वेळ ही हसन मुश्रीफ यांच्यावर देखील आली होती. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील घरी ईडीकडून धाड टाकण्यात आली, ज्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर जमून एकच गोंधळ घातला. त्या कारवाईची सल अद्यापही मुश्रीफांच्या मनात असल्याचे दिसून येते. त्याचमुळे काय की काय त्यांनी त्या कारवाईच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर टीका केली. परंतु हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याचा शरद पवार यांच्याकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. (Sharad Pawar criticized Hasan Mushrif statement)
हेही वाचा – NCP Split : हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाडांमधील वाद उफाळला, वाचा काय आहे प्रकरण?
शरद पवार यांची काल (ता. 25 ऑगस्ट) हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात सभा पार पाडली. या सभेला शाहू महाराज छत्रपती हे अध्यक्ष म्हणून आलेले होते. या सभेमध्ये शरद पवारांनी अजित पवार गटातील कोणत्याही नेत्याचे, आमदाराचे नाव न घेता टीका केली. पण त्यांच्या कालच्या सभेबाबत आज (ता. 26 ऑगस्ट) हसन मुश्रीफ यांनी मत व्यक्त केले आहे. “शरद पवार नेते आहेत. त्यांची विचारधारा, त्यांचे विषय, त्यांचा मी सन्मान करतो. पण भावना लक्षात घेतली पाहिजे. जानेवारीत माझ्यावर पहिल्यांदा ईडीचा छापा पडला. आम्ही न्यायालयातच लढा दिला. अनेक लोकांवर जेव्हा कारवाया झाल्या, तेव्हा सहानुभूती, मदत झाली. पण माझ्याबाबतीत तसे काही झाले नाही. ठीक आहे. आम्ही आमच्या समस्या सोडवू, अशी खंत व्यक्त करत मुश्रीफांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना लक्ष केले.
परंतु, आज शरद पवारांना मुश्रीफांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोल्हापुरात आज पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षाने काय करायचे? तुमच्या घरी छापा पडला तर पक्ष काय करू शकतो? यात पक्षाला हस्तक्षेप करता येत नाही. आम्ही कुणाच्याच बाबतीत हस्तक्षेप केला नाही. अनिल देशमुख तुरुंगात गेले. संजय राऊत तुरुंगात गेले. नवाब मलिक गेले. त्यामुळे आमच्यातल्या काही लोकांना तुरुंगात जावे लागले. पण जे गेले नाहीत, ते भाष्य करत आहेत, असा टोला शरद पवारांनी लगावला.
हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता पवार म्हणाले की, त्यांची सुटका कशी झाली हे मला माहिती नाही. त्यांनी कुणाशी सुसंवाद साधला हे मला माहिती नाही. ज्या अर्थी त्यांच्यावर आधी कारवाई झाल्याचे आम्ही वाचले आणि नंतर पुढची कारवाई थांबली याचा अर्थ काहीतरी सुसंवाद झाल्याचे दिसून येत आहे.
तर, हसन मुश्रीफांच्या या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाडांनी देखील समाचार घेतला. मुश्रीफांच्या वक्तव्यावर मत व्यक्त करताना आव्हाड म्हणाले की, “काय करायचे साहेबांनी? साहेबांनी काय करावे अशी इच्छा आहे? सहानुभूती म्हणजे काय असते? तुमच्यासह मी उभा आहे हे सांगणे सहानुभूती नाही का? शरद पवारांनी अजून काय करावे अशी अपेक्षा आहे?” असे सवाल आव्हाडांनी उपस्थित केले. सध्या जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही गटातील हे आमदार एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.