‘रेल्वे, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खासगीकरणाचा घाट’; शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात

केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

शरद पवार यांचा भाजपवर गंभीर आरोप, महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा केंद्राचा डाव
जयंतरावांच्या मुलाने आयफेल टॉवरवरुन केला मुलीला प्रपोझ, पवार म्हणतात आमची पोरं काय करतील नेम नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरमधून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खासगीकरणाचा मोदी सरकारचा घाट आहे. देशातील रेल्वे स्थानकांची विक्री करुन खासगीकरण करण्यात केंद्राला सर्वाधिक रस, आहे असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरु असल्याची टीका देखील पवारांनी केली.

“आज अनेक प्रश्न आपल्या समोरे आहेत. त्या प्रश्नांना आपल्याला समोरे जायचं आहे. पहिल्यांदा देशामध्ये राष्ट्राची जबाबदारी आज भाजपकडे आहे. लोकशाहीच्या पद्धतीने सरकार आलं त्याबद्दल तक्रार करण्याचं कारण नसतं. पण सरकार सत्तेत आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करायचा असतो. पण आपण बघतोय आता ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ते लोक त्या सत्तेचा उपयोग वेगळ्या पद्धतीने करत आहेत,” असं पवार म्हणाले.

रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्यात मोदी सरकारला रस

“आजचं सरकार काय करतंय? आजच्या केंद्र सरकारने एखादी नवीन रेल्वे लाईन टाकली आणि दळणवळणाची सोय केली तर मी त्यांचं अभिनंदन करेन. पण ते नवीन रेल्वे लाईन टाकण्यात त्यांचा रस नाही आहे. त्यांचा रस या देशातील रेल्वे स्टेशनची विक्री करुन त्यांचं खासगीकरण करणं यात आहे. ज्या देशामध्ये सुई सुद्धा तयार होत नव्हती. तिथे रेल्वेचं इंजिन तयार करण्याचं काम नेहरुंच्या काळामध्ये झालं. आज रेल्वेचं इंजिन असो वा रेल्वेची लाईन असो रेल्वेचं स्टेशन, ,समुद्रातील बंदर, विमानतळ असो या सगळ्याची विक्री करण्याची भूमिका आजचे राज्यकर्ते करत आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

“हा देश १५० वर्षे ब्रिटीशांच्या अखत्यारित्यात होता. त्याला मुक्त करण्यासाठी अनेकांनी कष्ट केले. सोलापूरचा एक इतिहास आहे. सोलापूर हुतात्म्यांचं शहर म्हणून देशात ओळखलं जातं. त्या हुतात्म्यांचा संघर्ष होता तो संघर्ष स्वातंत्र्यासाठी होता. महात्मा गांधींचा विचार संपादन करुन संपूर्ण देश एकडूट व्हावा यासाठी १५० वर्षे ज्यांचं राज्य होतं त्या राज्यकर्त्यांना इथून हाकलून दिलं. हे सगळं करायला अनेकांचं नेतृत्तव होतं. महात्मा गांधींचं नेतृत्त्व होतं, जवाहरलाल नेहरुंचं नेतृत्त्व होतं. सुभाषचंद्र बोस यांचं नेतृत्त्व होतं. मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नेतृत्व…किती नावं घेऊ. या अनेकांनी एक विचार दिला. त्यामुळे हा देश स्वातंत्र्य झालं. त्यानंतर १५० वर्षे गुलामगीरीत असलेल्या देशामध्ये विकास नावाची गोष्ट नव्हती. कारण राज्यकर्ते इंग्रज होते त्यांना या देशामध्ये विकास करण्याची यत्किंचित इच्छा नव्हती. म्हणून सत्तेचाळीस साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरुंचं नेतृत्त्व लाभलं आणि नेहरुंनी या देशात पायाभूत सुधारणा या कशा देता येतील याबाबत खबरदारी घेतली. रेल्वेचं जाळं वाढवलं, विजनिर्मितीची केंद्र उभी केली. भाक्रा नांगल सराखं धरण बांधलं. अनेक गोष्टी त्यांनी केल्या . आज त्यांची आठवण का होते तर त्यांनी मुलभूत कामं केली,” असं पवार म्हणाले.

इंधन दरवाढीवरुन शरद पवारांचा निशाणा

“आज सामान्य नागरिकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा महागाईचा प्रश्न आहे. एक दिवस असा जात नाही की आज पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले नाही. याचा अर्थ ज्यांच्याकडे मोटार आहेत त्यांनाच त्रास होतो असं नाही. तर दळणवळणाची साधणं
यावर देखील त्याचा परिणाम होतो आणि परिणामी महागाी वाढते. आजचं सरकार भाजपचं आहे. ज्यांची आर्थक निती महागाईला निमंत्रण देण्याची निती आहे. त्यामुळे सामान्य माणसाला संसार करणं अवघड झालं आहे. पूर्ण जबाबदारी भाजप सरकारवर आहे. त्यासाठी या लोकांच्या विरोधात जनमानस तयार करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षाला घ्यायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही मनस्थिती घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल,” असं पवार म्हणाले.

महाराष्ट्र बंदला शांततेत सहभागी व्हा

“हा देशी शेती प्रधान आहे. आज ६० टक्के शेती करतात. ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांची शेतकरी आणि शेती व्यवस्थांबद्दलची भूमिका काय? शेतकऱ्याबद्दल आस्था नाही. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे शेतकरी रस्त्यावर आले तर त्यांना चिरडून टाकलं. तुमच्या हातामध्ये सत्ता लोकांनी दिली ती या सगळ्या लोकांचं भलं करण्यासाठी दिली. त्याचं विस्मरण भाजप सरकारला झालं आहे. भाजप सरकारने त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांची हत्या करण्याचा पाप केलं. साहजीकच याचा संताप संपूर्ण देशमाध्ये आहे. महाराष्ट्रातल्या भाजप सोडून सगळ्या पक्षांनी हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी उद्याच्या ११ तारखेला सबंध महाराष्ट्र बंद ठेवायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी घ्या,” असं आवाहन पवार यांनी केली.