घरमहाराष्ट्र"हे पहिले पंतप्रधान आहेत जे...", शरद पवारांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

“हे पहिले पंतप्रधान आहेत जे…”, शरद पवारांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

Subscribe

पाचही राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. ज्यावरून विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला होता. परंतु, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून मोदींवर टीकास्त्र डागले आहे.

सोलापूर : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. पाच राज्यांपैकी मिझोराम राज्यातील विधानसभा आणि छत्तीसगडमधील पहिल्या टप्प्यातील मतदान 7 तारखेला पार पडले आहे. आता उद्या म्हणजेच 17 नोव्हेंबरला छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्याशिवाय मध्यप्रदेशातही उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पाचही राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. ज्यावरून विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला होता. याआधी सुद्धा पंतप्रधान मोदी हे केवळ एका पक्षाचे पंतप्रधान आहेत की संपूर्ण देशाचे? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली होती. परंतु, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून मोदींवर टीकास्त्र डागले आहे. (Sharad Pawar criticizes PM Narendra Modi over election campaign)

हेही वाचा – ठाकरे बंधूंचा एक सूर; रामलल्ला दर्शनावरून राज यांनी घेतलं भाजपला फैलावर

- Advertisement -

शरद पवार हे आज (ता. 16 नोव्हेंबर) सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, दुर्दैवाने ज्या पद्धतीच्या गोष्टी पंतप्रधान मांडत आहेत, त्या प्रकारचे राजकारण आम्ही कधी पाहिले नाही. मी पंडित जवाहरलाल नेहरूंची भाषणे ऐकली आहेत. तेव्हा मी कॉलेजला शिकत होतो. त्यानंतर इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्रींपासून सर्व पंतप्रधानांची भाषणे मी ऐकली. त्यांनी एक पथ्य असे पाळले की पंतप्रधान कोणत्याही राज्यात गेले, तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत अनादराने कधीही काही बोलले नाहीत. पण हे पहिले पंतप्रधान आहेत की जे एखाद्या राज्यात जातात आणि तिथे जर इतर पक्षाचे नेतृत्व असेल तर त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करतात.

तसेच, या पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान हेच चित्र दिसते. माझी खात्री आहे की लोक हे मान्य करणार नाहीत. याची किंमत मोदींना चुकवावी लागेल. ज्यावेळी आत्मविश्वास ढळतो, त्यावेळी अशा व्यक्तिगत टीका-टिप्पणी माणूस करायला लागतो. असे कोणत्याही पंतप्रधानांनी केले नव्हते. दुर्दैवाने असे करणाऱ्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता आहे. त्याचे परिणाम दिसतील. तर, मध्य प्रदेशात भाजपाला जिंकून आणा, रामलल्लाचं दर्शन मोफत करून देऊ”, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना केली होती. यांवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, मंदिरात जायला काय पैसे द्यावे लागतात का? पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला काही पैसे द्यावे लागत नाहीत. पण हे राम मंदिरात तुम्हाला दर्शन फुकट वगैरे सांगतायत याचा अर्थ इतक्या पातळीवर राज्यकर्ते उतरलेत, की त्याची चर्चाही न केलेली बरी.

- Advertisement -

यावेळी त्यांनी जागा वाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना म्हणाले की, राज्यातील 48 जागा आणि विधानसभांच्या जागांबाबत बऱ्यापैकी चर्चा झाली आहे. दिवाळी असल्याकारणाने इतक्या दिवस कोणतीही बैठक किंवा चर्चा झाली नव्हती. मात्र, आता पुन्हा चर्चता करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तर महाविकास आघाडीतील इतर लहान पक्षांना देखील यामध्ये सहभागी करून त्यांचे मत विचारात घेण्यात येईल. असे सांगतच ते पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यावर आमची भूमिका स्पष्ट असली तरी याबाबत इतर पक्षांची मते विचारात घेणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पवारांकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -