सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, असे वक्तव्य काल गुरुवारी (ता. 24 ऑगस्ट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. पण काल लेकीने केलेल्या वक्तव्याला आज (ता. 25 ऑगस्ट) शरद पवार यांच्याकडून सुद्धा दुजोरा देण्यात आला होता. अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचे कारण नाही, असे वक्तव्य आज सकाळी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केले. परंतु, आता त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. मी असे काही बोललो नसल्याचे त्यांनी पत्रकारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर म्हटले आहे. त्यामुळे काही तासांमध्ये शरद पवारांनी स्वतःच्याच वक्तव्यावरून यु-टर्न घेतल्याने आणखी एक संभ्रम निर्माण झाला आहे. (Sharad Pawar denied the statement about Ajit Pawar)
हेही वाचा – Sharad Pawar : “अजित पवार आमचेच नेते…,” सुप्रिया सुळेंपाठोपाठ शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ
आज सकाळी बारामती आणि आता साताऱ्यातील दहिवडी येथून केलेल्या दोन्ही वक्तव्यामुळे शरद पवार यांची राजकीय खेळी अद्यापतरी कोणाच्याही लक्षात आलेली नाही. अजित पवार आमचेच नेते आहेतपासून ते मी असे काही बोललोच नाही हे सांगायला शरद पवार यांना फक्त 5 तास लागले. अजित पवार आमचे नेते असे मी म्हटले नाही. सुप्रिया असे म्हणू शकते. मी नाही, असा दावा साताऱ्यातील दहिवडी येथून बोलताना शरद पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर केला आहे.
यावेळी पत्रकारांकडून पक्षा फुटीबाबत शरद पवार यांना प्रश्न करण्यात आला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही कारवाईची मागणी केली. तुम्ही आमच्या पक्षात असाल आणि तुम्ही काही चुकीची भूमिका घेतली आणि मी तुमच्यावर कारवाई केली याचा अर्थ ती पक्षातील फूट नाही, असे शरद पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तर अजित पवार यांना पुन्हा राष्ट्रवादीत संधी देणार का? असा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले की, एकदा एखादी भूमिका घेतली असेल करेक्शन केली असेल, तर ती संधी झाली. एकदा पहाटेचा शपथ विधी झाला होता. दोन लोकांचा हा शपथविधी होता. त्यात आमचेही एक सहभागी होते. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून जे झाले ते योग्य नव्हते, आता त्या मार्गाने जाणार नाही असे म्हटले होते. त्यामुळे त्यांना संधी दिली होती, पण संधी मागायची नसते. संधी द्यायची नसते. आमची हीच भूमिका आहे, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद केले असल्याचेच दिसून येत आहे.
बारामतीतील शरद पवारांचे वक्तव्य…
ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे, असे विधान शरद पवार यांनी केले होते.