औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावर शरद पवारांची नाराजी

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतर केल्याचे निर्णय घेतल्यानंतर आम्हाला समजले. निषेध वगैरे त्याला अर्थ नाही. आम्ही जो कार्यक्रम ठरवलेला होता, त्याचा हा भाग नव्हता.' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत नाराजी व्यक्त केली.

sharad pawar on chief ministers eknath shinde security

‘औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतर केल्याचे निर्णय घेतल्यानंतर आम्हाला समजले. निषेध वगैरे त्याला अर्थ नाही. आम्ही जो कार्यक्रम ठरवलेला होता, त्याचा हा भाग नव्हता.’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारची शेवटची मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद तसेच उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केला. (Sharad Pawar displeasure over renaming of Aurangabad and Osmanabad cities)

प्रस्तावानुसार, औरंगाबादचे नाव संभाजी नगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यात आले. मात्र या नामांतरावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. “आमचा किमान रणनीतीचा जो कार्यक्रम करण्यात आला होता. त्यावेळी त्याचा हा भाग नव्हता. तसेच, हा निर्णय शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, आमच्याशी याबाबत कोणाशीही सुसंवाद नव्हता. नामांतराबाबत निर्णय घेतल्यानंतरच आम्हाला समजले. निषेध वगैरे त्याला अर्थ नाही. त्यावेळी आम्हा सर्वांची सामूहिक समंतीही नव्हती. मंत्रिमंडळाच्या कामाची पद्धत असते. मंत्रिमंडळ कामाच्या पद्धतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो. तिथे मतदान नसते. फक्त मतं व्यक्त केली जातात. मंत्रिमंडळ बैठकीत मतं व्यक्त केली गेली. मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो, त्याच पद्धतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला”, असे शरद पवार यांनी म्हटले.

“मात्र हा भाग समान कार्यक्रमात नव्हता. औरंगाबादच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या काही गोष्टी केल्या असत्या, तर इथल्या जनतेला त्याचा आनंद झाला असता. तसेच, शासकीय धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्याची जी पद्धत होती, त्यामध्ये काहीही चर्चा झाली नाही. एक भावनेचा प्रश्न उपस्थित झाला नसता, तर मला आनंद झाला असता. पक्ष म्हणून हा निर्णय घेतलेला नव्हता. आमच्या पक्षाच्या व्यासपीठावर याची चर्चा झाली. असा एकही प्रसंग नाही जो माझ्या कानावर आला नाही”, असेही शरद पवार यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले. ही बैठक २९ जून रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी या बैठकीमध्ये तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पहिलं म्हणजे औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. औरंगाबादचं नामांतर केल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तर उस्मानाबादचं नामांतरण धाराशीव करण्यात आलं आहे.

अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

• औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)

• उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
(नगर विकास विभाग)

• राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)

• कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार
(विधि व न्याय विभाग)

• अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
(परिवहन विभाग)

• ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

• विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
(नियोजन विभाग)

• निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

( सामान्य प्रशासन विभाग)

• शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.
(महसूल विभाग)


हेही वाचा – मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत खासदारांच्या बैठकीला सुरूवात