सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर शरद पवारांनी घेतली महत्त्वाची बैठक

सातारा जिल्हा बँकेतील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज(मंगळवार) सातारा दौऱ्यावर होते. त्यांनी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात शशिकांत शिंदे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. परंतु शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शरद पवार हे सुद्धा नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिंदे यांच्या समर्थकांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. या पराभवाची गंभीर दखल राष्ट्रवादीने घेतली आहे. आमदार शिंदे यांचा पराभव एका मतांनी झाल्यामुळे कराडला जाण्याऐवजी सातारा शासकीय विश्रामगृहात उशीरा थांबवण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला. त्यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते.

शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यामुळेच माझी राजकीय ओळख आहे. परंतु कालच्या निवडणुकीत स्वत: शरद पवार आणि अजित पवार यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही गोष्टी वेगळ्या घडल्या असून आम्ही गाफील राहीलो. त्याचा मोठा फटका बसल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बड्या नेत्यांनाही झटका बसला आहे. पाटण सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पराभूत झाले आहेत. शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकर यांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई यांना ४४ मते मिळाली आहेत. तर पाटणकर यांना ५८ मते मिळाली आहेत. पाटणकर हे ७ मतांनी विजयी झाले आहेत.