..म्हणून शरद पवार आजही ‘डाऊन टू अर्थ’; वाचा त्यांचा हा अफलातून प्रवास

‘लेखक तुमच्या भेटीला’ कार्यक्रमात शरद पवारांच्या दिलखुलास गप्पा

sharad pawar
शरद पवार यांनी मुलाखत घेताना लेखक तथा कुसुमाग्रज स्मारकाचे विश्वस्त माजी आमदार हेमंत टकले. समवेत ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार.

नाशिक – सुरुवातीच्या काळात सर्किट हाऊस, हॉटेल्स असं काही नव्हतं. त्यामुळे सभा, राजकीय कार्यक्रम, भेटीगाठी या दौऱ्यांवेळी कार्यकर्त्यांच्या घरीच मुक्काम असे. यानिमित्ताने कौटुंबिक ऋणानुबंध निर्माण झाले, त्या-त्या ठिकाणची भाषा, तिथले प्रश्न, गावकऱ्यांची नावं हे सारंकाही माहित झालं. तो जिव्हाळा आजही टिकून आहे, या शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला राजकीय प्रवास अत्यंत सहजपणे उलगडून सांगितला. यानिमित्ताने त्यांच्या ‘डाऊन टू अर्थ’ असण्याचं कारणही आपसूकच पुढे आलं.

ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास (सांस्कृतिक विभाग) या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.६) पासून ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमाचे पहिले पुष्प शरद पवार यांनी गुंफले. ऑनलाइन पध्दतीने आयोजित या कार्यक्रमात ‘लोक माझे सांगाती’ राजकीय आत्मचरित्र यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संवाद साधला. त्यांची लेखक, विश्वस्त कुसुमाग्रज स्मारक हेमंत टकले यांनी मुलाखत घेतली. यावेळी ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, पूर्वी राजकीय वातावरण खूप वेगळं होतं. माणसं भेटली की ती कुटुंबाचा भागच बनत असत. एखादी ओळख ही पिढ्यान पिढ्या कायम राहताना बघितलंय. मात्र, आता राजकारण बदललं आहे. राजकारणात नवीन पिढी येत आहे, तीही चांगली आहे. मात्र राजकीय पक्षातल्या या तरुणांना चटकन मोठं व्हायचं असतं. ते योग्य नाही. सामान्य माणसांच्या जीवानात काय फरक पडेल ते तरुणाईने समजून घेतले पाहिजे. तरुणाईने झटकन पुढे जाऊ नये. कष्ट करावेत, कोणत्याही क्षेत्रात सुसंवाद ठेवावा. जे समजत नाही ते समजून घ्यावे. तरुणांनी लोकांमध्ये गेलं पाहिजे, स्वत:चं नेतृत्व भक्कम केलं पाहिजे. त्यातूनच तरुणांना संधी मिळेल, असा सल्लाही शरद पवारांनी तरुणाईला दिला.