शरद पवारच सुप्रीमो

पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मागे, राज्यभरात राष्ट्रवादीचा जल्लोष

संग्रहित छायाचित्र

माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने आणि विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठित केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी केली. पदत्यागाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत निर्माण झालेली अस्वस्थता पवारांनीच संपुष्टात आणली. पवारांनी आपल्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडत पेढे वाटत या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. राजीनामा मागे घेतल्यानंतर पवार राज्याच्या दौर्‍यावर निघाले, तर त्यांचा पुतण्या विरोधीपक्ष नेते अजित पवार हेही आठवडाभर स्वतंत्र्यपणे दौर्‍यावर निघाल्याने नाटकाचा तिसरा अंक अजून बाकी आहे.

त्याचवेळी मी पुनश्च अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते. त्यामुळे माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदार्‍या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनमानसापर्यंत पोहचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करीन, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

२ मे २०२३ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मवृत्ताच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलताना शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी हबकले होते. पवार यांच्या या धक्कातंत्राचा मानसिक धक्का कार्यकर्त्यांना बसला होता. त्यामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून मनधरणी सुरू होती.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीत समितीने ठराव करून शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर केला. पक्षाच्या अध्यक्षपदी पवार यांनीच कायम रहावे ही समितीच्या सदस्यांची सामूहिक भावना आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करून पवारसाहेबांनी राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी साहेबांना प्रत्यक्ष भेटून करणार असल्याचे समितीचे सदस्य आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा जो अनपेक्षित निर्णय जाहीर केला याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली.

या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. माझ्या निर्णयानंतर पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, नेते तसेच प्रेम करणारी जनता आणि हितचिंतक यांच्यात प्रतिक्रिया उमटली. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्या भावनेचा मी अनादर करू शकत नाही. त्याचसोबत समविचारी पक्षांचे नेते राहुल गांधी, सीताराम येचुरी यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी संपर्क साधून देशात सध्या जे वातावरण आहे ते पाहता आपण कार्यरत असणे ही काळाची गरज असल्याचे सांगितल्याने त्यांच्याही भावनांचा आदर राखत मी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे पवार म्हणाले.

पक्ष सोडून जाणार्‍यांना कसे रोखणार?
मात्र शरद पवार महत्वपूर्ण घोषणा करत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अनुपस्थित होते. याबद्दल प्रश्न केला असता सर्वच नेत्यांनी पत्रकार परिषदेला उपस्थित असणे आवश्यक नसते. आपल्या राजीनाम्याच्या निर्णयाची अजित पवार यांना कल्पना दिली होती. त्यामुळे ते पक्षात नाराज नाहीत. त्याचवेळी कोणाला पक्ष सोडून जायचे असेल तर कसे रोखणार, असा सवाल करत पवार यांनी अजित पवारांच्या नाराजीबद्दल संशय कायम ठेवला.

उत्तराधिकारी ठरवून होत नसतो
तुमची अध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यानंतर कोणी उत्तराधिकारी ठरविणार का असा प्रश्न विचारला असता, असा कोणी उत्तराधिकारी ठरवून होत नसतो. एखादी जागा मोकळी होत असेल तर पक्षातील नेते एकत्र बसतात आणि ते त्याबाबत निर्णय घेत असतात. एखादी व्यक्ती असा निर्णय ठरवत नसतो, मात्र पक्षात आता नवीन लोकांना संधी देणार आहे. काही पदाधिकारी हे गेली अनेक वर्षे त्याच पदावर कायम आहेत. त्यांनीही इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना आता राष्ट्रीय पातळीवर काम करायचे आहे. अशांबाबत पक्षाचे नेते निश्चित विचार करतील. तसेच माझ्याकडे नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे की जी राज्य आणि देशपातळीवर चांगले काम करू शकते, असे शरद पवार म्हणाले.
पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड करण्याची कार्यकर्त्यांची मागणी खुद्द सुप्रियाला मंजूर नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी घेतलेल्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.जनतेला पर्याय देण्यासाठी आघाडीची स्थापना झाली आहे. ते काम आम्ही निश्चितपणे करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाणांना गांभीर्याने घेत नाही
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गुप्त भेट झाल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबाबत विचारले असता, काही व्यक्तींची मते ही पक्की असतात. पृथ्वीराज चव्हाण हे त्यापैकी एक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच त्यांचे आमच्याबदल प्रतिकूल मत होते. त्यामुळे आम्ही त्यांची मते गांभीर्याने घेत नाही. जनता त्यांना किती गांभीर्याने घेते हे मला माहिती नाही, असा टोला पवार यांनी लागवला.

आता लगेच दौरे सुरू
राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर लगेचच आपण आता दौर्‍यावर जाणार आहोत. आजच आपण पुण्याला जाणार असून त्यानंतर सोलापूर,सांगोला, पंढरपूर नंतर निपाणीला जाणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. यावेळी प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते.

उत्तराधिकारी असणं आवश्यक, ठरवून होत नसतो
तुमची अध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यानंतर कोणी उत्तराधिकारी ठरविणार का असा प्रश्न विचारला असता, असा कोणी उत्तराधिकारी ठरवून होत नसतो. एखादी जागा मोकळी होत असेल तर पक्षातील नेते एकत्र बसतात आणि ते त्याबाबत निर्णय घेत असतात. एखादी व्यक्ती असा निर्णय ठरवत नसतो, मात्र पक्षात आता नवीन लोकांना संधी देणार आहे. काही पदाधिकारी हे गेली अनेक वर्षे त्याच पदावर कायम आहेत. त्यांनीही इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना आता राष्ट्रीय पातळीवर काम करायचे आहे. अशांबाबत पक्षाचे नेते निश्चित विचार करतील. तसेच माझ्याकडे नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे की जी राज्य आणि देशपातळीवर चांगले काम करू शकते, असे शरद पवार म्हणाले. पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड करण्याची कार्यकर्त्यांची मागणी खुद्द सुप्रियाला मंजूर नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी घेतलेल्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.जनतेला पर्याय देण्यासाठी आघाडीची स्थापना झाली आहे. ते काम आम्ही निश्चितपणे करू, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

२०१९ ते २०२३…ते ७८ तास
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २०१९ मध्ये बंड करत २३ नोव्हेंबरच्या सकाळी भाजपच्या देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सरकार स्थापन केले होते. मात्र शरद पवारांनी आपला सर्व जोर पणाला लावून अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणताच अजितदादांचे बंड फसले आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखालील ७८ तासांचे सरकार कोसळले. यावेळीही अजित पवार समर्थक ३५हून अधिक आमदारांसोबत भाजपची वाट धरतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु आताही शरद पवारांनी २ मे रोजी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करत ५ मे रोजी ७८ तासांचे राजीनामानाट्य घडवून आणले. त्यामुळे पक्षात सर्व लक्ष आपल्याभोवती केंद्रित करून हे संभाव्य बंड होण्याआधीच संपवले.

निर्णयाचे स्वागत, पण सर्वांनी जबाबदारी उचलावी
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम रहावे, हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करून पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा. राष्ट्रवादी, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. त्याचवेळी पवार साहेबांच्या वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन येणार्‍या काळात सर्वांनी अधिक जबाबदारी उचलावी, असे आवाहनही करत आहे –अजित पवार, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस