शरद पवार हे राजकारणातील भीष्म, पण…; राष्ट्रवादीतील घडामोडींवर ठाकरे गटाचे भाष्य

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा (Nationalist Congress Party) तडकाफडकी राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असा हा विषय असला तरी शरद पवार हे या घडामोडींचे नायक आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरूच राहतील. पवार हे राजकारणातील भीष्म आहेत, पण भीष्माप्रमाणे आपण शरपंजरी पडलेले नसून सूत्रधार आपणच आहोत, हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे भाष्य ठाकरे गटाने या सर्व घडामोडींवर केले आहे.

हेही वाचा – पवारांच्या राजीनाम्यानंतर कुंपणावरच्या नेत्यांचाच जास्त विलाप, ठाकरे गटाची टिप्पणी

पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना एका विशिष्ट परिस्थितीत केली. पवार हे काँग्रेस विचारांचे व भूमिकेचे नेते. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावरून त्यांनी आतापर्यंतचे राजकारण केले. त्यांच्या समाजकारणाचा वाटाही मोठा आहे. पवार यांनी आतापर्यंत दोनवेळा काँग्रेसचा त्याग केला व स्वतःचा स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. कधी सत्तेत तर अनेकदा विरोधात राहून त्यांनी राजकारण केले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. शरद पवार यांनी आत्मचरित्रात नव्याने काय लिहिले व जोडले, हा पुढचा विषय, पण त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेने जी खळबळ माजली ते आत्मचरित्राबाहेरचे एक स्वतंत्र प्रकरण आहे. तब्बल 60 वर्षांपेक्षा जास्त काळ पवारांचे राजकारण सुरू राहिले. 27व्या वर्षी ते प्रथम आमदार झाले. तेव्हापासून त्यांच्या राजकारणाचा वेग जराही कमी झालेला नाही. पवारांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केले व अनेकांचे राजकारण बिघडवले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या कार्यकर्त्यांच्या भावना
शरद पवार यांनी वयाची 80 वर्षे कधीच पार केली आहेत व तरीही पवार हे सक्रिय राजकारणात अविरत क्रियाशील आहेत. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्याच नावाने उभा आहे व चालला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर सभागृहातील उपस्थितांत भावनाकल्लोळ झाला. त्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांनीच खरे सांगितले. पाटील यांना अश्रू अनावर झाले व म्हणाले, ‘तुम्ही म्हणजेच पक्ष आहात. आम्ही तुमच्याकडे बघूनच राजकारणात आलो व तुमच्याच नावानं मतं मागतो. तुम्हीच नसाल तर, आम्ही तरी पक्षात का राहायचे? आम्हीही राजीनामे देतो!’ जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या व त्या खऱ्या आहेत, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – अजित पवारांचे अंतिम ध्येय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे…, ठाकरे गटाचा निशाणा