कोल्हापूर : मागील वर्षी जून महिन्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडली आणि दोन गट तयार झाले. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा फूट पडली आणि त्यांच्यातही दोन गट तयार झाले. राष्ट्रवादीमध्ये तर पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांच्या पुतण्याने म्हणजेच अजित पवार यांनी फूट पाडली आणि ते शिंदे-भाजप सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी एकाच वेळी राष्ट्रवादीमधील 30 पेक्षा अधिक आमदारांना स्वतःच्या बाजूने वळवले आणि त्यांच्या समर्थनातील 8 आमदारांसह मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादीमध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत.
हेही वाचा – COVID घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांची आज दुसऱ्यांदा होणार चौकशी
शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत आणि याबाबत सर्वांनाच माहिती आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर 82 वर्षीय शरद पवार हे पुन्हा एकदा नव्याने मैदानात उतरले आहेत. पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्याची सुरुवात शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यापासून केली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पवारांनी देखील राजकीय खेळी करत आपल्या नव्या इनिंगची सुरुवात येवल्यातून केली. त्यानंतर त्यांची दुसरी जाहीर सभा ही गुरुवारी (ता. 17 ऑगस्ट) बीडमध्ये झाली. त्यानंतर आता शरद पवार नवी खेळी करत पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणीची सुरुवात करणार आहेत. कारण कोल्हापुरात शरद पवार यांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली तर राज्यातील तिसरी सभा होणार आहे.
कोल्हापूर म्हटले की राजकारण क्षेत्रातील पहिले नाव येते ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचे. मुश्रीफ हे कोल्हापूरच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना आहे, त्यामुळे कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. पण हसन मुश्रीफ हे आता स्वतःच अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले असून त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री पद देण्यात आले आहेत. मुश्रीफ हे अजित पवार गटात सहभागी झाल्यानंतर अद्याप तरी शरद पवार हे त्यांच्याबाबत काहीही बोललेले नाहीत. पण आता येत्या 25 ऑगस्टला कोल्हापुरातील दसरा चौक येथे शरद पवार हे सभा घेणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. (Sharad Pawar meeting against Hasan Mushrif will be held in Kolhapur on August 25)
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आता शरद पवार मोर्चेबांधणी करणार आहेत. त्यामुळे या सभेमध्ये पवार मुश्रीफांना थेट लक्ष करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तेच उमेदवार असतील, अशी देखील चर्चा करण्यात येत आहे. पण याबाबत आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे.
लोकसभेची तशा पद्धतीची चर्चा अजून तरी झालेली नाही. त्याबद्दल निर्णय झाल्यास आम्ही नक्की कळवू. पण जे आवश्यक आहे, जे होणार आहे ते करावेच लागते. तर याआधीच काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेवर दावा करण्यात आला आहे. परंतु कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तो राष्ट्रवादीनेच लढावा, असे मत जयंत पाटील यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. तर शरद पवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत, हा गैरसमज काहीजण पसरवत आहेत. पवार महाराष्ट्रभर सभा घेणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने कोल्हापुरात सभा होत आहे. यापुढे जळगाव आणि पुणे येथे सभा होणार आहे. त्यामुळे पवारांबद्दल गैरसमज पसरवण्याचे चुकीचे काम होत असल्याचेही जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.