घरदेश-विदेशएकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

Subscribe

आज उद्धव ठाकरेंना भेटणार, भाजपला बसणार धक्का

मागील ४ वर्षांपासून पक्षांतर्गत सापत्न वागणुकीमुळे नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता राजकीय पातळीवर मोठा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपला डावलून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन केल्यानंतर आता खडसे यांनी उघडपणे पक्षनेतृत्त्वावर दोषारोप करण्यास सुरुवात केली. सोमवारी खडसे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव यांना भेटण्यासाठी नवी दिल्लीत आले मात्र प्रत्यक्षात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास चर्चा केल्यानंतर खडसे मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत.त्यामुळे काही दिवसांत भाजपला मोठा धक्का बसेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या 6 जनपथ निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा केली. मात्र, या दोघांमध्ये नेमकी कार्य चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. खडसे सध्या भाजपच्या पक्षनेतृत्त्वावर नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. मागच्या आठवड्यात त्यांनी भाजपमध्ये ओबीसी समाजाचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला आहे. कोणी पक्षाविरोधात काम केले त्यांची नावांसहित आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. पक्षाकडून आता काय कारवाई होते त्याची प्रतीक्षा आहे, असे खडसे म्हणाले होते.

- Advertisement -

मला पक्षाच्या सुकाणू समितीवरून काढण्यात आले. जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु वारंवार असाच अन्याय होत राहिल्यास मला पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही खडसे यांनी दिला आहे.

पक्ष उभारणीसाठी मी मेहनत घेतली. परंतु त्याच पक्षाने मला फळ काय दिले? मला पक्षात बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगवेगळ्या चौकशीचे आदेश दिले, कोणतेही कारण नसताना पक्षाने माझ्यावर कारवाई का केली? मात्र, अशी कारवाई माझ्यावरच नव्हे तर अगोदर गोपीनाथ मुंडे यांच्यावरही करण्यात आली होती. मला स्पर्धेतून बाहेर करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षातील अशा लोकांची मी आरती करावी काय, असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

- Advertisement -

आजवर राजकीय करिअरमध्ये अनेक पक्षांनी मला अनेक वेळा त्यांच्या पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या. मला वेगवेगळी पदे देण्याच्या ऑफर देखील दिल्या गेल्या. मात्र, मी पक्ष सोडण्याचा कधीही विचार केला नाही. पक्ष वाढवला आणि विस्तार केला. मात्र, आता पक्षातून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. कारण नसताना आरोप केला जात असेल, हेतुपरस्पर मला टाळले जात आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत तरीही मला क्लीन चिट दिली गेली नाही, असे खडसे यांनी पवार यांना भेटायला जाण्याआधी माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -