लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘तुतारी’ला फटका बसला होता. ट्रम्पेट चिन्हामुळेच साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीतही ट्रम्पेट चिन्हामुळे ‘तुतारी’च्या उमेदवारांना थोडक्या मतांनी पराभूत व्हावं लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हामुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीनं निवडणूक आयोगाकडे धाव घेत चिन्ह गोठवण्याची विनंती केली होती. मात्र, आयोगानं मराठीतील ‘तुतारी’ हे नाव काढून इंग्लिशमध्ये ‘ट्रम्पेट’ असंच ठेवत चिन्ह गोठावलं नाही.
हेही वाचा : आत्मपरीक्षण करू आणि महाराष्ट्रासाठी…; पराभवाच्या 24 तासांनंतर सुळेंची प्रतिक्रिया
यातच विधानसभा निवडणुकीत 163 ठिकाणी अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळालं होतं. यात 78 ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते. पण, 9 ठिकाणी थोडक्या मतांनी ‘तुतारी’च्या उमेदावारांना ट्रम्पेटमुळे पराभवाचा सामना करावा लागला.
यामध्ये माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, परांड्यातून तानाजी सावंत यांच्याविरोधातील उमेदवार राहुल मोटे, आंबेगात दिलीप वळसे-पाटील यांच्याविरोधात उमेदवार देवदत्त निकम यांचा एक-दोन हजारांच्या मतांनी पराभव झाला.
ट्रम्पेटचा कुणाला कुठे बसला फटका?
- घनसावंगी : राजेश टोपे – 2,309 मतांनी पराभव ( ट्रम्पेटला मते : 4,830 ) ( विजयी : हिकमत उढाण, शिंदेंची शिवसेना )
- आंबेगाव ( पुणे ) : देवदत्त निकम – 1,523 मतांनी पराभव ( ट्रम्पेटला मते : 2,965 ) ( विजयी : दिलीप वळसे-पाटील, अजित पवार राष्ट्रवादी )
- पारनेर : राणी लंके – 1,526 मतांनी पराभव ( ट्रम्पेटला मते : 3,582) ( विजयी : काशिनाथ दाते, अजित पवार राष्ट्रवादी )
- अणुशक्तीनगर : फहाद अहमद – 3,378 मतांनी पराभव ( ट्रम्पेटला मते : 4,075 ) ( विजयी : सना मलिक, अजित पवार राष्ट्रवादी )
- शहापूर ( ठाणे ) : पांडुरंग बरोबर – 1,672 मतांनी पराभव ( ट्रम्पेटला मते : 3,892 ) ( विजयी : दौलत दरोडा, अजित पवार राष्ट्रवादी )
- बेलापूर : संदीप नाईक – 377 मतांनी पराभव ( ट्रम्पेटला मते : 2,860 ) ( विजयी : मंदा म्हात्रे, भाजप )
- परांडा : राहुल मोटे – 1,509 मतांनी पराभव ( ट्रम्पेटला मते : 4,446 ) ( विजयी : तानाजी सावंत, शिंदेंची शिवसेना )
- केज : पृथ्वीराज साठे – 2,678 मतांनी पराभव ( ट्रम्पेटला मते : 3,559 ) ( विजयी : नमीता मुंडदा, शिंदेंची शिवसेना )
- जिंतूर : विजय भांबळे – 4,516 मतांनी पराभव ( ट्रम्पेटला मते : 7,430 ) ( विजयी : मेघना बोर्डीकर, भाजप )
हेही वाचा : …तर तुझं काय झालं असतं? अजित दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला