Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रSharad Pawar : पालिका निवडणुका ठाकरे स्वबळावर लढवणार? शरद पवारांनी दिली ही...

Sharad Pawar : पालिका निवडणुका ठाकरे स्वबळावर लढवणार? शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया

Subscribe

कोल्हापूर : नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. एकीकडे शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना आता यावर महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरेंचा आहे. पण त्यांच्याकडून टोकाची भूमिका ठाकरे घेतील, असे मला वाटत नाही.” असे मत त्यांनी व्यक्त केले. (Sharad Pawar NCP SP on Uddhav Thackeray Shvisena UBT decision on Municiple elections)

हेही वाचा : Uddhav Thackeray : पाठीत वार केला तर वाघनखं काढू, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (23 जानेवारी) शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे जंयतीनिमित्त अंधेरी येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी बोलणी झाल्यानंतर पुन्हा निर्णय घेऊ, असे म्हणत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. यावरून शरद पवारांनी सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि माझी भेट झाली होती. तेव्हा त्यांनी स्वबळावर लढण्याबाबत चर्चा केली. पण त्यांची टोकाची भूमिका दिसली नाही.” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच ते पुढे म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण करण्याचा अधिकार हा दोन्ही पक्षांकडे आहे. पण, दोन्ही पक्षांचे मेळावे पाहिले तर उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला अधिक लोकांची उपस्थिती होती” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीतील काही नेते पक्षात प्रवेश करणार असल्याचे विधान केले होते. त्यावर विचारले असताना शरद पवार म्हणाले की, “उद्योगमंत्री सामंत हे दावोसला उद्योग आणण्यासाठी गेलेत की पक्ष फोडायला?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “ते आमदार खासदार कधी फुटतात मी याचीच वाट पाहत आहे,” अशा अंदाजात त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसले होते. यावरून त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “त्या कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. अजित पवार यांची खुर्ची बदलली कारण नवीन सहकार मंत्री होते, त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. मीच म्हटलं की, मग माझ्या बाजूला बसा.” असे ते म्हणाले.