नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अशामध्ये सोमवारी (18 नोव्हेंबर) संध्याकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येत आहे. तर यावर आता शरद पवारांनीदेखील निषेध करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील निशाणा साधला. (Sharad Pawar on Anil Deshmukh NCP SP attacked in Nagpur)
हेही वाचा : Nagpur : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; नेमकं काय घडलं?
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “मी हल्लीच काटोलला गेलो होतो. त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा देशमुख पिता पुत्राला मिळत होता, तो प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाचे लोक अस्वस्थ झाले असल्याचे माझ्या ऐकिवात आले होते. देशमुखांना प्रतिसाद मिळत आहे, हे सहन न झाल्याने सत्ताधाऱ्यांनी शारीरिक हल्ला करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याची मी पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्राथमिक माहितीनुसार, निवडणूक विषयीच हा हल्ला आहे,” असा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, “गेली काही दिवस अनिल देशमुख आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये एक प्रकाराचा संघर्ष होता. या संघर्षात त्यांच्यावर हल्ला होईल हे आमच्या ऐकिवात होते. जे ऐकण्यात होते, ते आज प्रत्यक्षात घडलेले आहे. अनिल देशमुख यांच्यासारख्या सभ्य आणि सुसंस्कृत नेत्यावर हल्ला झाला. ते रक्तबंबाळ झाले असून यातून एकच गोष्ट सिद्ध होते की, सत्ताधारी पक्ष सत्तेसाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो.” अशी टीका त्यांनी यावेळी केली. “डोक्यात दगड घालून, स्वत: रक्तबंबाळ होऊन कुणी सहानुभूतीचा प्रयत्न कुणी करू शकतो? एका बाजूला असे हल्ले करायचे आणि दुसऱ्या बाजूला हा राजकीय स्टंट असल्याचे सांगायचे यातून एक गोष्ट सिद्ध होते की सत्ताधारी पक्ष कोणत्याही पातळीवर जायला तयार आहे.” असे म्हणत त्यांनी भाजपच्या केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. या हल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर भाजपने हे एक राजकीय नाट्य असल्याची टीका केली होती.