“तुम्ही माझा निषेध करा किंवा कांद्याच्या माळा घाला, पण मी….”, कांदाप्रश्नी शरद पवार यांचं वक्तव्य

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अहमदनगरमधील पारनेरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र शरद पवार या दौऱ्याला येण्यापूर्वी पारनेर कारखाना बचाव आणि पुनर्जीवन समितीने 'शरद पवार-गो बॅक' आंदोलनाची घोषणा केली होती.

Sharad-Pawar

सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न पेटला आहे. कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. विरोध पक्षाने देखील हा प्रश्न विधानसभेत उचलून धरला. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. “कांद्याचा भाव वाढला म्हणून दंगा करणारे लोक आज कांद्याचे भाव पडले तर ढुंकून बघायलाही तयार नाहीत.” असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता भाजपवर टीका केलीय.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अहमदनगरमधील पारनेरच्या दौऱ्यावर आहेत. जवळा इथे उद्धाटन आणि शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. मात्र शरद पवार या दौऱ्याला येण्यापूर्वी पारनेर कारखाना बचाव आणि पुनर्जीवन समितीने ‘शरद पवार-गो बॅक’ आंदोलनाची घोषणा केली होती. पारनेरच्या रस्त्यावर “शरद पवार-गो बॅक’ असंही लिहिण्यात आलं होतं.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी ते कृषी मंत्री असतानाचा एक किस्सा सांगितला. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, कृषी मंत्री असताना कांद्याचे भाव वाढले होते. तेव्हा भाजपचे काही खासदार कांद्याच्या माळा घालून आले होते. कांद्याच्या वाढलेल्या किंमतीचा निषेध करण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपचे खासदार कांद्यच्या माळा घालून उभे राहिले. कांद्यांच्या वाढलेल्या किंमतीवर काहीतरी मार्ग काढा, अशी मागणी त्यांनी केली होती. कांदा हा जिरायत शेतकऱ्याचं पीक आहे. कसेबसे दोन पैसे शेतकऱ्याला मिळतात. दोन पैसे कुठे शेतकऱ्याला मिळाले तर कांद्याच्या माळा घालून तुम्ही निषेध करता. तुम्ही माझा निषेध करा किंवा गळ्यात कांद्याच्या माळा घालून या, पण कांद्याची किंमत करण्यासाठी मी कधीच पाठिंबा देणार नाही आणि हेच माझं धोरण आहे.”

यापुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, कांद्याला किलोमागे ८ ते १० रूपयांचा खर्च येतो आणि हाच कांदा जेव्हा शेतकरी बाजारात विक्रीला नेतात तेव्हा याच एका कांद्यामागे ३ ते ४ रूपये मिळतात. मग अशा हवालदील शेतकऱ्याने त्याचा संसार कसा चालवायाचा, बॅंकेचे कर्ज कसं फेडायचं’, असा सवाल देखील शरद पवारांनी व्यक्त केलाय. त्यामुळे संसदेत कांदा प्रश्नी आवाज उठवणार असल्याचं देखील शरद पवार म्हणाले. तसंच केंद्र आणि राज्य सरकारला निर्यात करायला लावणार असल्याचं देखील ते म्हणाले.

सध्या राज्यात कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. मिळणाऱ्या भावातून वाहतुकीचा खर्चही वसूल होत नाही, अशी परिस्थिती आहे. अनेकांना मोठ्या प्रमाणावर कांदा विकून देखील दोन चार रुपये मिळत आहेत. यामुळे उत्पादन खर्च सोडा वाहतूक खर्च देखील निघत नाही. त्यामुळे राज्यातील कांदा शेतकरी हवालदिल झालाय.