मविआमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेणार का? यावर शरद पवार म्हणाले…

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला राजकीय संघर्ष आतापर्यंत वेळोवेळी दिसून आलेला आहे.

Sharad-Pawar-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्यातील जुनं भांडण हे सर्वांनाच माहित आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर आणि आघाडीच्या नेत्यांचं राजकारण कायम परस्पर विरोधी राहिलेलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला राजकीय संघर्ष आतापर्यंत वेळोवेळी दिसून आलेला आहे. अशात महाविकास आघाडीच्या निमित्ताने हे दोघेही एकाच छताखाली आले असले तरी या दोघांमधलं भांडण काही मिटण्याचं नाव घेत नाही. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या कराड दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत मोठं सूचक वक्तव्य केलंय. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांना पत्रकारांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेऊन आगामी निवडणूका लढवणार का? याबाबत प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “मला याबद्दल काही माहिती नाही. मी या चर्चेत नसतो. निवडणूकीला सामोरे जाताना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांनी एकत्र यावं, ही आमची विचारधारा आहे. यावर सध्या चर्चा सुरू आहे, परंतू अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. एकत्र बसून निर्णय घेऊ. सध्या तरी मतदारसंघनिहाय आढावा घेतला नाही. पण तो घ्यावा लागणार आहे.”

यावेळी शरद पवार यांनी चिंचवड पोटनिवडणूकीत मिळालेल्या अपयशावरही वक्तव्य केलं. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “चिंचवडमध्ये राहूल कलाटे उभे राहिले नसते तर निकाल वेगळा लागला असता. पण लोकशाहीत प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे.” कसबा पोटनिवडणूकीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “कसबा हा भाजपचा बालेकिल्ला होता. काही महत्त्वाच्या भागातील भाजपची मते कमालीची घटली आहेत. यावरून भाजपवरची लोकांमध्ये असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून आली.”