बीड : मागील वर्षी जून महिन्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडली आणि दोन गट तयार झाले. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा फूट पडली आणि त्यांच्यातही दोन गट तयार झाले. राष्ट्रवादीमध्ये तर पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांच्या पुतण्याने म्हणजेच अजित पवार यांनी फूट पाडली आणि ते शिंदे-भाजप सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी एकाच वेळी राष्ट्रवादीमधील 30 पेक्षा अधिक आमदारांना स्वतःच्या बाजूने वळवले आणि त्यांच्या समर्थनातील 8 आमदारांसह मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादीमध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. (Sharad Pawar or Ajit Pawar? NCP leader still confused)
शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत आणि याबाबत सर्वांनाच माहिती आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर 82 वर्षीय शरद पवार हे पुन्हा एकदा नव्याने मैदानात उतरले आहेत. पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्याची सुरुवात शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यापासून केली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पवारांनी देखील राजकीय खेळी करत आपल्या नव्या इनिंगची सुरुवात येवल्यातून केली. त्यानंतर त्यांची दुसरी जाहीर सभा ही गुरुवारी (ता. 17 ऑगस्ट) बीडमध्ये झाली. ज्यानंतर त्यांच्याबाबत अजित पवार गटातील एका नेत्याने फेसबूकवर भावनिक पोस्ट केली आहे. अमरसिंह पंडित असे या बीडमधील नेत्याचे नाव असून त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
बीडमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेसाठी शरद पवार हे बीडमध्ये दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत झाले. परंतु यावेळी शरद पवारांनी सभेमध्ये अजित पवापर गटातील आमदार असलेले धनंजय मुंडे यांचा कोणताही उल्लेख केला नाही किंवा त्यांच्यावर टीका केली नाही. तर दुसरीकडे शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी मात्र खडसून टीका केली. पण या सभेमध्ये शरद पवार यांनी अमरसिंह पंडित यांचे नाव घेत एक किस्सा सांगितला. ज्यानंतर पंडित यांनी फेसबुक पोस्ट लिहिली. त्यांच्या या फेसबुक पोस्टमुळे ते अद्यापही शरद पवार गटात जावे की अजित पवार गटातच राहावे, या कारणामुळे संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे.
अमरसिंह पंडितांची फेसबुक पोस्ट…
श्रध्देय साहेब,
काल, आज आणि भविष्यातही तुमच्याबद्दल श्रध्दा आणि आदर कायम राहील. कालच्या सभेत आपण माझ्या तोंडी घातलेल्या वाक्याबाबत मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही. आपल्या कानी कोणी काय घातले हे मला माहित नाही, त्याविषयी जाणून घेण्यात स्वारस्यही नाही मात्र हे अत्यंत क्लेषदायक आहे, एवढेच सांगतो.आम्हा भावंडांवर श्री.शिवाजीराव पंडित यांचे संस्कार आहेत, त्यामुळे केवळ तुमचे वय झाले म्हणून नेतृत्व बदल केला असे तोडके विचार आमच्या मनी येणार नाहीत. याबद्दल सार्वजनिक ठिकाणी सोडा परंतु वैयक्तिक सुध्दा कोणाला बोललेलो नाही. तुम्हाला शंभर वर्षे निरामय आयुष्य लाभो हीच सदैव भवानी चरणी प्रार्थना आहे. तुमच्या सोबत अनेक वर्षे निष्ठेने काम करताना अनेक संधी आणि प्रलोभने मिळाली मात्र त्यावेळी कधीही डगमगलो नाही, तुमची साथ सोडली नाही. राजकारणाच्या पलिकडे जावून पवार परिवाराशी शिवछत्र परिवाराचा स्नेहबंध, तो भविष्यातही जपणार आहे.
तुम्ही आणि अजितदादा वेगळे व्हावेत हेच मुळात पटत नाही… असो, राजकीय निर्णय घेताना वैयक्तिक लाभाचा विचार कधीच मनाला शिवला नाही, लाभापायी काही निर्णय घेणार नाही याची खात्री तर तुम्हालाही असेल. बाकी माणुसकी वगैरे जपणारच कारण तुमचेच राजकीय संस्कार आहेत. – अमरसिंह पंडित
अजित पवार गटात सहभागी झालेले आमदार हे शरद पवार हेच त्यांचे खरे दैवत असल्याचे वारंवार सांगत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार हे गेलेल्यांविषयी एक शब्द देखील काढत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. परंतु बीडमधील सभेत शरद पवार हे अमरसिंह पंडित यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, “जिल्ह्याच्या नेत्यांना काय झाले आहे माहिती नाही. एका नेत्याने सांगितले कोणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. आम्ही चौकशी केली की काय झाले? आजपर्यंत सर्वकाही ठीक होते. पण असे कळले की त्यांना अमरसिंह पंडितांनी काहीतरी सांगितले. काय सांगितले तर पवार साहेबांचे आता वय झाले आहे, त्यामुळे आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. पण माझे त्यांना एवढचं सांगण आहे. माझे वय झाले आहे असे तुम्ही म्हणता पण तुम्ही माझे काम बघितले आहे. ज्याच्यामुळे तुमचं भलं झालं त्यांची थोडी तरी जाणीव ठेवा,” असा शब्दात त्यांनी पंडितांची भर सभेत कानउघडणी केली. पंरतु पंडित यांनी आपण असे काहीही बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे.