प्रतीक पाटलांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून पवारांचे फोटो गायब, चर्चांना उधाण

शिंदेंच्या बंडखोरीमुळे आता सर्व पक्षांना आपापले आमदार सांभाळून ठेवण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी कोणता आमदार भाजपच्या गोटात जाईल, याची भीती राजकीय पक्षांना सतावते आहे. 

jayant patil
jayant patil

सांगलीः महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीसांचं सरकार सत्तेवर येईपर्यंत राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. शिंदेंनी शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आणि 12 खासदार आपल्या गोटात घेतले आहेत. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांभोवतीही संशयाची सुई फिरत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देताना डावलल्याची भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विशेष म्हणजे जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरूनही शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंचे फोटो दिसत नाही आहेत. ते गायब झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा राष्ट्रवादीत दबक्या आवाजात सुरू आहे. शिंदेंच्या बंडखोरीमुळे आता सर्व पक्षांना आपापले आमदार सांभाळून ठेवण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी कोणता आमदार भाजपच्या गोटात जाईल, याची भीती राजकीय पक्षांना सतावते आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, परंतु ते दोघे भाजप सरकार स्थापन करू शकले नाहीत, सरकार अवघ्या 80 तासांत पडले. त्यानंतर शरद पवारांच्या पुढाकारानं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना विरोध करणाऱ्या पक्षांशी संधान साधून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्येही जयंत पाटलांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नाही, ते पद पवार कुटुंबातील व्यक्ती असलेल्या अजित पवारांना बहाल करण्यात आलं.

विशेष म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांसोबतही एक प्रकारे गद्दारी करत फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केलं होतं. परंतु नंतर त्यांनाच उपमुख्यमंत्री बनवण्यात आल्यानं जयंत पाटीलही नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतच बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, त्याच्या जागी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले.


हेही वाचाः शिवसैनिक अनेकदा जेलमध्ये गेले, स्वत:चे जीवन शिवसेनेसाठी समर्पित केले; आमदार केसरकरांचा ठाकरेंना टोला