घरताज्या घडामोडीपवारांची मनधरणी सुरूच

पवारांची मनधरणी सुरूच

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाट्यमयरित्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा होऊन २४ तास उलटल्यानंतरही त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाविषयीचे गूढ बुधवारी कायम होते. शरद पवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. त्यामुळे आज गुरुवारी शरद पवार यांचा निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, शरद पवार यांनी बुधवारी दिवसभर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये थांबून कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी पवार यांनी नवा अध्यक्ष नेमण्यासाठी नेमलेली समिती जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असे सांगितल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. हा निर्णय मी कुणाला न विचारता घेतला. सांगून घेतला असता तर तुम्ही मला थांबवले असते. आता उद्या बैठक होईल. त्यात सगळे जण भूमिका मांडतील. तुमच्या भावना तिथे मांडण्यात येतील. समिती जो निर्णय घेईल तो निर्णय आपण मान्य करूया, असे पवारांनी सांगितल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला.

शरद पवार यांनी मंगळवारी आपल्या लोक माझ्या सांगाती या राजकीय आत्मवृत्ताच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केली. या अनपेक्षित घोषणेतून मिळालेल्या धक्क्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजून सावरलेले नाहीत. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी कार्यकर्ते दुसर्‍या दिवशीही आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, तर माजी मंत्री आणि ठाणे जिल्ह्यतील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. लोकशाही पद्धतीवर श्रद्धा असलेले शरद पवार अचानक राजीनामा देतात हे न पटणारे आहे. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा असे जनमत आहे. त्यामुळे त्यांनी ते मानावे, अशी आग्रही भूमिका आव्हाड यांनी मांडली.

- Advertisement -

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर शरद पवार बुधवारी सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दाखल झाले. दुपारी एक वाजेपर्यंत ते तिथे होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना भेटून राजीनामा मागे घेण्याची विनंती करीत होते. केरळचे राष्ट्रवादीचे नेते पीसी चाको, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, रोहित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांनी पवार यांची भेट घेतली.

दरम्यान, शरद पवार यांनी नवा अध्यक्ष सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीची आजच बैठक होणार असल्याची अफवा पसरली होती. यावर प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत अशी कुठलीही बैठक बोलाविली नसल्याचे सांगितले. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज कुठलीही बैठक बोलाविलेली नाही. अध्यक्षपदाबाबत कुठलाही निर्णय केलेला नाही. तसेच पवार यांनी काल घेतलेल्या निर्णयाचा फेरविचारही केलेला नाही. आम्ही काल त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी 2-3 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. त्यामुळे पवार यांना शांतपणे विचार करू द्या. आम्ही त्यांना पुन्हा भेटू. त्यानंतर अधिकृतपणे पक्षाची भूमिका सांगू.

- Advertisement -

सध्यातरी मी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही. माझ्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी असून ती मी योग्य पद्धतीने पार पाडेन, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे देऊ नयेत. त्यांनी धीर ठेवावा. आमचा पक्ष एक आहे, एकच राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज बोलाविलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निमंत्रण नाही तसेच त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या अफवा उठल्या होत्या. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले. जयंत पाटील यांचा नाराजीचा सूर नाही. काल ते किती भावनिक होते हे आपण सर्वांनी पाहिले आहे. आज त्यांच्या कारखान्याची बैठक पुण्यात असल्याने ते संध्याकाळी मुंबईत परततील. पक्षाची बैठकच नसल्याने त्यांना निमंत्रण देण्याचा प्रश्न नाही, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले, मात्र कुठल्याही पदाधिकार्‍याने राजीनामा देऊ नये, असे आवाहन पटेल यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -