घरताज्या घडामोडीहिंदू-मुस्लिम बंधुभाव संपवून आपला अजेंडा चालवण्याचा त्यांचा हेतू, पवारांचे ज्ञानवापी मशीद प्रकरणावर...

हिंदू-मुस्लिम बंधुभाव संपवून आपला अजेंडा चालवण्याचा त्यांचा हेतू, पवारांचे ज्ञानवापी मशीद प्रकरणावर मोठं विधान

Subscribe

देशात ज्ञानवापी मशिदीवरुन हिंदू आणि मुस्लिम संघटनांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. ज्ञानवापी मशिदीमध्ये नंदी मूर्ती आणि शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्येनंतर देशातील वातावरण शांत होईल असे वाटलं होतं. हिंदू-मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधील बंधुभाव संपवायचा आणि आपला सांप्रदायिक अजेंडा चालवता यावा असा त्यांचा हेतू असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून कोणी मशिदीचा विषय कोणी काढला नव्हता असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केरळमध्ये एखा कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर देशात शांतता नांदेल असे आम्हाला वाटलं होतं. पण भाजपची विचारसरणी वेगळी आहे. असे आणखी विषय काढून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अयोध्येच्या प्रकरणानंतर आता वाराणसीचा मुद्दा पुढे करून वातावरण बिघडवण्याकडे लक्ष दिले जातंय असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

- Advertisement -

मंदिर जितकं जुने तितकीच मशीदही

वाराणसीत एक मंदिर आहे. मंदिराला विरोध नाही. पण मंदिराजवळ मशीदही आहे. आज मशिदीवरून नवा मुद्दा उपस्थित करून देशात जातीय वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही खूप जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आला. भाजप आणि त्यांच्या सर्व संघटना या कामात सहभागी झाल्या आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे देशासह जगभरातील लोक अभिमान बाळगतात असे शरद पवार म्हणाले.

कोणतरी येतो आणि म्हणतो ताजमहाल आमचा

ताजमहालसारखी वास्तुकला ही आपल्या देशाची ओळख आहे. राजस्थानचा कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो की ताजमहाल आमचा आहे. आमच्या पूर्वजांनी ते बनवले. दिल्लीचा कुतुबमिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे. तेथील न्यायालय यासंदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कुतुबमिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. मी हे म्हणतोय कारण आज देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जातीयवादी विचारांना चालना दिली जात आहे.

- Advertisement -

एक मुद्दा संपला की दुसरा आणायचा असा अजेंडा

मोदी सरकार आणि भाजप आज देश चालवत आहे. एक मुद्दा संपला की नवा मुद्दा समोर आणायचा, असा त्यांचा अजेंडा आहे. काहीही करून देशात हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे आणि हे लोक आपला जातीय अजेंडा चालवतील. देशातील महिलांना घर चालवणे कठीण झाले आहे. महागाई वाढली आहे. मात्र महागाई कमी करण्यासाठी ते कोणतेही पाऊल उचलत नाहीत. बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यांना उत्तर देण्याचा एकच मार्ग आहे. जातीयवादी विचारांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्रितपणे पावले उचलावी लागतील असे पवार म्हणाले.

भाजपविरोधी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज

जातीयवादी विचारांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्रितपणे पावले उचलावी लागतील. आजच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी उर्वरित शक्तींना बळ द्यावे लागेल. केरळमध्ये सर्व पुरोगामी आघाड्यांनी ज्या प्रकारे डाव्या आघाडीची उभारणी केली, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी आहे. या मोर्चाप्रमाणे इतर राज्यातही काम करण्याची गरज आहे. त्यामुळे जिथे निवडणुका होतात तिथे राष्ट्रवादीचे एकच धोरण असते, भाजपला हरवा आणि काढा. देशातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी भारतीय जनता पक्षाला हटवण्याचा कार्यक्रम स्वीकारण्याचे ठरवले आहे. या कामात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असेल. या देशात परिवर्तन घडवण्याची राष्ट्रवादीची इच्छा आहे. देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती व्हावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. आपल्या सर्व सहकाऱ्यांनी असेच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी – नितीन राऊत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -