आमची कमिटमेंट उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांचा पुनरुच्चार

Sharad pawar on Shinde and Fadnavis  Government

बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आमची कमिटमेंट उद्धव ठाकरे यांच्याशी असून ठाकरे सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सोबतच काही जण ही मॅच फिक्सिंग असल्याचे म्हणत आहेत, परंतु यात तथ्य नाही. असे असते तर आम्ही एवढी ओढाताण का करीत आहोत? राज्यात एवढी आंदोलने का होत आहेत, असा प्रश्नही शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला. ते दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. कालच एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा आम्हाला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. बंडखोर आमदार पहिल्यांदा सुरतला गेले. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. या दोन्ही राज्यांत कोणाचे सरकार आहे, असा प्रश्न उपस्थित करीत शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर शरद पवार म्हणाले की, राष्ट्रपती राजवट लागू झाली तर भाजपने एवढे कशासाठी केले? राष्ट्रपती राजवट लागू होणार असेल तर आमदारांच्या बंडाला काय अर्थ आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी मुंबईत यावे. संख्याबळ असेल तर ते गुवाहाटीत का थांबले आहेत? अद्यापही राज्यातील सरकार स्थिर आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत परतल्यानंतर आपली भूमिका बदलतील. शिवसेना याबाबत योग्य पावले उचलत आहे, असेही शरद पवार म्हणाले.