शरद पवारांचा राजीनामा मागे पण अजित पवार कुठेत?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. यावेळी शरद पवारांनी हा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, शरद पवारांनी यांनी आज आपला राजीनामा मागे घेतला असून अजित पवार हे पत्रकार परिषदेत दिसले नाहीत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी अजित पवारांचे नाव न घेता शरद पवार म्हणाले की, या ठिकाणी कोणी उपस्थित आहे की नाही?, यावर चर्चा करू नये, असं स्पष्टीकरण पवारांनी देत फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी त्यांनी आपली पत्रकार परिषद थांबवली होती. जसे जयंत पाटील हे वाय.बी. चव्हाण सेंटरमधील पवारांच्या पत्रकार परिषदेत आले, त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषदेला सुरूवात केली.

माझ्या राजीनाम्याच्या निर्णयाची अजित पवारांनी कल्पना दिली होती. कुणाला सोडून जायचं असेल, तर मग कोणत्याही पक्षाचा असो कोणी थांबवू शकत नाही. अशी परिस्थिती असेल तर पुढाकार घेत, यात बदल कसं घडवू शकतो, याकडं लक्ष दिलं पाहिजे. हे मला समजतं, असं शरद पवारांनी सांगितलं.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.


हेही वाचा : BIG BREAKING : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राजीनामा मागे