कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजल्यापासून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचाराला हजेरी लावली. या निवडणुकांच्या प्रचाराचा आज (ता. 08 मे) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. भाजपने तर कर्नाटकात भाजपचे कमळ फुलविण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कर्नाटकात जाऊन भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. तर निपाणीतील एका भाषणांत त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळत पक्षावर टीका केली. महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. हा पक्ष काय डोंबलं करणार आहे इथे येऊन?, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. पण त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रत्युत्तर देणार आहेत.
हेही वाचा – Karnataka Election : देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “हा पक्ष काय डोंबलं करणार?”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी त्यांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पाडल्यानंतर त्यांनी लगेच दौरे करण्यास सुरूवात केली आहे. रविवारी त्यांनी सांगोला आणि पंढरपूर येथील दौरा आटोपून सोलापुरातील राष्ट्रवादीच्या सहकाऱ्याच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. यानंतर आज सोमवारी (ता. 08 मे) त्यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बालाजी सरोवर येथील हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांशी आणि पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आले असता, याबाबतची उत्तरे निपाणीत जाऊन देणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधी शरद पवार हे कर्नाटकातील निपाणी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांचा प्रचार करणार आहेत.
पण त्याआधी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी आज निपाणीला चाललो आहे. त्यामुळे कोण पार्सल आहे, कोण किती वर्षाचं आहे, या सगळ्यावर तिकडे सविस्तरपणे बोलेन. त्यामुळे सध्या तरी शरद पवार यांनी काही वेळासाठी वेट अँड वॉचची भूमिका घेण्यासाठी सांगितले आहे. तर शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांना नेमके काय उत्तर देणार याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुका या कर्नाटकात असल्या तरी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये चांगलेच वाकयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आता शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वाद किती पेटणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्नाटकातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून आज शेवटचा प्रयत्न करणार आहेत. यंदाची कर्नाटक विधानसभा निवडणूक ही अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद असो, महाराष्ट्रातील नेत्यांचा मराठी उमेदवारांच्या विरोधातील प्रचार असो अशा एक ना अनेक कारणामुळे या विधासभा निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नेहमी प्रमाणे कर्नाटकातले मतदार एकाच पक्षाची सत्ता कायम न ठेवता दुसऱ्या पक्षाच्या हाती सत्ता देतील की भाजप कर्नाटकातील 38 वर्षे जुनी परंपरा मोडीत काढण्यासाठी यशस्वी ठरतील.