DCM फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांनी एका वाक्यात दिले प्रत्युत्तर, म्हणाले…

निपाणी येथे झालेल्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. त्यांच्या या विधानाला थोडक्यात पण खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

Sharad Pawar responded to DCM Fadnavis' criticism in one sentence

कर्नाटकात उद्या बुधवारी (ता. 10 मे) 225 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा कर्नाटकात प्रचाराला हजेरी लावली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते कर्नाटकात प्रचारासाठी पोहोचले होते. पण निपाणी येथे झालेल्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. हे पार्सल पॅक करून महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ, असे त्यांनी विधान केले होते. त्यांच्या या विधानाला थोडक्यात पण खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे. (Sharad Pawar responded to DCM Fadnavis’ criticism in one sentence )

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
“महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार निपाणी मतदार संघात आहे. हा पक्ष काय डोंबलं करणार आहे इथे येऊन? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे.” अशी टीका केली. तर “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ,”, अशी फडणवीस यांनी त्यांच्या निपाणी विधानसभेतील प्रचार सभेत केली होती.

शरद पवार हे रविवारी (ता. 07 मे) आणि सोमवारी (ता. 08 मे) सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना या विधानाबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी निपाणीत जाऊन सगळ्यांची उत्तरे देईन असे सांगितले होते. पण याबाबत निपाणीच्या प्रचार सभेत त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य करत त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले नाही. पण आज (ता. 09 मे) साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांना पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी याला प्रत्युत्तर देत म्हणाले की, “ते काहीही बोलू शकतात. त्यांचे वैशिष्ट्य आहे की, काही काम न करता फक्त शब्दांचा खेळ खेळायचा आणि शब्दांचा खेळ खेळण्यासाठी काही लोक हुशार असतात.”

याआधी एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटका विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येणार, असे मत व्यक्त केले होते. याबाबत बोलताना ते म्हणाले होते की, “दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, बंगालमध्ये भाजपाची सत्ता नाही. देशाचा नकाशा पाहिल्यास लक्षात येईल की, अनेक राज्यात भाजपा सत्तेवर नाही. इतर राज्यात नॉन भाजपा सरकार आहे. त्याचबरोबर आता कर्नाटकमधील स्थानिक लोक भाजपावर नाराज आहेत, त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असं दिसतंय.”


हेही वाचा – अंबादास दानवेंचा शिंदेंवर हल्लाबोल, कर्नाटक विधानसभेच्या प्रचारावरुन टीका