दिल्लीवरुन महाविकास आघाडी सरकारला रोज त्रास दिला जातोय – शरद पवार

शरद पवार यांचा भाजपवर गंभीर आरोप, महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा केंद्राचा डाव
जयंतरावांच्या मुलाने आयफेल टॉवरवरुन केला मुलीला प्रपोझ, पवार म्हणतात आमची पोरं काय करतील नेम नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीतील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मोदी सरकार राज्यातील महाविकास आघाडी सरकारला रोज त्रास देत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

राज्यात आघाडीचं सरकार आहे. सगळ्यांना घेऊन चालेलं आहे. आघाडीचं सरकार असून देखील कुणी काहीही म्हटलं तरी अत्यंत समंजसपणाने काम करत आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अतिवृष्टी झाली पहिला हप्ता देण्यासाठी ३६० कोटी रुपये काल दिलेत, आणखी दिले जाणार आहेत. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढायचं आहे. त्याच्या भल्यासाठी सरकार आहे, ही भूमिका असताना दिल्लीवरून या सरकारला अनेक गोष्टींवरून रोज त्रास दिला जातोय, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

जालियनवाला हत्याकांडाशी केलेली तुलना रूचली नाही

मला दिल्लीत एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने सांगितलं की, तुमचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. पण त्या दिवशी तुम्ही जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केला, ते काही रूचलं नाही आणि म्हणून तुमच्याकडे पाहुणाचार झाला. लोकशाहीमध्ये एखाद्या प्रश्नावर मत मांडायचा अधिकार आहे की नाही? जर लोकशाहीत मत माडलं म्हणून तुम्ही घरांवर अशा पद्धतीने आणि ते देखील कुणाच्या बाया-बापड्यांच्या, मुलींच्या ज्यांचा संबंध नाही, त्यांच्या घरावर तुम्ही छापे मारणार असाल, तर ठीक आहे तुम्ही मारा. त्याची अजिबात चिंता नाही. पण, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, जिजामातेचा महाराष्ट्र आहे, सावित्राबाईंचा महाराष्ट्र आहे, आहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे. इथे आमची भगिनी कधीही लाचार होणार नाही. तुम्ही छापा मारा नाहीतर काही वाटेल ते करा पण आपलं मत कधी सोडणार नाही. सामान्य माणसांची बांधिलकी कदापी सोडणार नाही, या निष्कर्षाशी आपण सगळेजण आहोत, असं पवार म्हणाले.