आगामी निवडणुका मविआने एकत्र लढवाव्यात

शरद पवार यांचे स्पष्ट मत

Sharad Pawar targets opponents Religious sentiments should be limited to everyone not in front of others house

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. सत्तेत असूनही काँग्रेस आणि प्रामुख्याने राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप करीत शिवसेना आमदार सत्तेतून बाहेर पडले. यानंतर महाविकास आघाडीचे पुढे काय हे स्पष्ट नसताना महाविकास आघाडीने आगामी निवडणुकाही एकत्र लढवाव्यात ही माझी वैयक्तिक इच्छा आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पवार रविवारी औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य करताना नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात आले. किमान समान कार्यक्रमात औरंगाबादचे नामांतर करण्याचा मुद्दा नव्हता. औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आले, पण मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतिम असतो. मंत्रिमंडळाच्या निर्णयावर नंतर बोलणे योग्य नसते. त्याऐवजी तेथील पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले असते, तर योग्य झाले असते.

भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असून कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही असाच प्रयोग राबवला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. सरकार पाडण्यासाठी काही निश्चित कारण नव्हते. कुणी राष्ट्रवादीचे नाव घेते, कुणी हिंदुत्वाचे कारण सांगते, तर कुणी ईडीचे नाव घेतले. ही सर्व कारणे सुरतला गेल्यानंतर ठरली. त्याआधी तसे काही कानावर आले नव्हते. त्यामुळे त्यांनी ते जनतेसमोर यावे आणि स्पष्ट करावे. त्यांच्याकडे काहीच सक्षम कारण नाही.

अडीच वर्षे राज्यपालांकडे कष्टाची कामे होती. त्यामुळे त्यांना मविआच्या मागणीकडे लक्ष देता आले नाही. आम्ही विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी, अशी राज्यपालांकडे मागणी केली होती. ती काही त्यांनी मान्य केली नाही, पण दुसरे सरकार येताच त्यांनी ही मागणी ४८ तासांमध्ये मान्य केली. असे करणारे आपले पहिलेच राज्यपाल असतील, असे म्हणत पवार यांनी राज्यपालांवरही तोंडसुख घेतले.

मध्यावधी होतील असे म्हटलो नाही
राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे मी कधीच म्हटलो नाही. अडीच वर्षे झालीत, आता केवळ अडीच वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे आतापासूनच आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा असे मी म्हणालो, असा खुलासाही यावेळी शरद पवार यांनी केला.