उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून दोनदा पवारांनी रोखले

गेल्या आठवड्यात दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे अंतर्मन जागृत होऊन मुख्यमंत्रिपदाचा मोह ठाकरे घराण्याला नाही हे वारंवार सांगत होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोनदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यापासून रोखून धरलं. मविआ सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले असून येत्या काही दिवसात ठाकरे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचताच गेल्या अडीच वर्षांपासून राज्याची सूत्रे आपल्या हाती ठेवणारे उद्धव ठाकरे यांच्याकडील मुख्यमंत्रीपदाचे काऊंटडाऊनदेखील सुरू झाले आहे. भाजप किंवा शिंदे गटाकडून सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल होण्याचीही दाट शक्यता आहे. फ्लोअर टेस्ट झाल्यास सरकार कुठल्याही क्षणी कोसळेल. शिंदे गटाने म्हणजे एकेकाळच्या आपल्याच सहकार्‍यांनी मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले, तर उद्धव ठाकरेंसाठी ही मोठी नामुष्कीची बाब असेल. त्याआधी आपणच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकावा या विचारापर्यंत उद्धव ठाकरे येऊन पोहचले आहेत. त्यामुळे ते कुठल्याही क्षणी राजीनामा देण्याची शक्यता आहे, तर जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती येत नाही, तोपर्यंत राजीनामा देऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यात येत आहे.

याआधी २२ जून रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांचे मन वळवल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला होता. या सत्तानाट्यात आठवडाभर कुठेही न दिसलेल्या काँग्रेस नेत्यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता, तर त्यांच्या जोडीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल हेदेखील उपस्थित होते.


हेही वाचा : मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, तुम्हाला आज वचन देतो – आमदार राहुल पाटील