राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला रवाना, सरकार वाचवण्यासाठी जोरदार हालचालींना सुरूवात

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज दिल्लीला (Delhi) रवाना होणार आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी आता शरद पवार मैदानात उतरले असून जोरदार हालचालींना वेग आला आहे. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी कोर्टात भक्कम बाजू मांडण्यासंदर्भात बंडखोर १६ आमदारांच्या निलंबनावर पवारांकडून सल्ला देण्यात आला आहे.

शरद पवार यांचा दिल्ली दौरा राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र या दौऱ्यात ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करतील तसेच इतर विरोधी पक्षासोबत महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २७ जून रोजी विरोधी पक्षातील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी पवार दिल्लीला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडी कायदेशीर लढा एकत्र लढणार असून मविआ कोर्टामध्ये भक्कमपणे भूमिका मांडेल, असं देखील पवारांनी म्हटलं आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण कायदेशीर बाजू मांडण्याचा प्रयत्न शरद पवार करत असल्यामुळे मविआतील अनेक नेते पवारांची भेट घेत आहेत.

दरम्यान, शिवसेना आमदारांचे बंड हे शरद पवार थंड करणार का हीच चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. दुसरीकडे आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.


हेही वाचा : एकनाथ शिंदेगटाची गोची , कायद्याची गुंतागुंत, विलीनीकरणाशिवाय पर्याय