घरताज्या घडामोडीमाझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान, विठूरायाच्या दर्शनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान, विठूरायाच्या दर्शनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. परंतु त्यांनी आपला राजीनामा मागे घेतल्यानंतर हे राजकीय नाट्य संपलं असून राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. यानंतर आज शरद पवार हे पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी पवारांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तसेच शेतकरी मेळाव्यास देखील त्यांनी संबोधित केलं. मात्र, माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी विठूरायाच्या दर्शनानंतर दिली.

शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशात फार ठिकाणी मंदिरात जात नसतो. पण, काही मंदिर ही माझ्या अंत:करणात आहेत. त्यामध्ये पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर सुद्धा आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने मानसिक समाधान मिळतं. विठ्ठल हा देशातील कष्टकरी सर्वसामान्यांचा दैवत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून उन्हातान्हाचा विचार न करता, दर्शनासाठी याठिकाणी लोक येतात. त्यामुळे सामान्य माणसाला समाधान देणारे हे मंदिर आहे, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यास पवारांनी संबोधित केले.

- Advertisement -

या कारखान्याच्या आरंभापासून ते आजपर्यंत अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो आहे. देशाचे नेते स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यासोबत आलो होतो. नंतरच्या काळात कारखान्याच्या उभारणीची जबाबदारी औदुंबर अण्णांनी आपल्या खांद्यावर घेतली. तुमच्या आधीच्या पिढीने औदुंबर अण्णांना शक्ती आणि ताकद दिली. त्यामुळे वेणूनगरचा कारखाना उभा राहिला. चव्हाण साहेबांचे आशीर्वाद होते. वेणूनगर हे नाव का दिले हे तुम्हाला माहीत आहे. आपल्या महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण साहेब होते. उभे आयुष्य त्यांना ज्यांनी साथ दिली त्या त्यांच्या धर्मपत्नीचे नाव वेणूताई होते. अण्णांनी ठरवले की नाव द्यायचे असेल तर आपल्या नेत्याच्या पत्नीचे द्यायचे. म्हणून या नगरीला वेणूनगर नाव देण्यात आले.

येथील कारखानदारी लहान होती. हळूहळू ती इथपर्यंत येऊन पोहचली. तुम्ही लोकांनी ऊसाची लागवड जास्त केली तर 10 लाख टन गळीत होईल. मी तुम्हाला खात्री देतो की हा कारखाना जिल्ह्यामध्ये एक नंबरचा भाव देणारा कारखाना म्हणून यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचे कारण तो योग्य दिशेने चालला आहे. एक काळ असा होता की कारखाना फक्त साखरेशिवाय दुसरे उत्पादन करत नव्हता. त्याच्या आधी केवळ गुळ, नंतर साखर, हळूहळू वीजनिर्मिती व त्यानंतर इथेनॉलची निर्मिती इथे करू लागले. आता बायोगॅसची निर्मिती केली जाते. यातून चार पैसे जास्त मिळतील. ते कारखान्याच्या सभासदांना व कष्टकऱ्यांना मिळतील याची मला खात्री आहे. फार चांगले काम अभिजीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. हा जिल्हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. एक काळ असा होता की हा जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जायचा. मला आठवत आहे की १९७२ साली या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. त्यावेळी जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ पडला.

लोक जगवायचे कसे हा प्रश्न होता. पण आम्ही सगळ्यांनी कष्ट केले. औदुंबर अण्णा होते, शिंदे होते, जगताप होते अशी अनेकांची नाव घेता येतील. या सर्वांची सामूहिक शक्ती या जिल्ह्याच्या कष्टकर्‍यांच्या मागे उभी होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की दररोज ५ लाख लोक दुष्काळी भागात काम करायचे. १५ दिवसांनी त्यांची मजुरी द्यावी लागायची. त्यासाठी अधिकाऱ्यांना पहाटे चार-चार वाजेपर्यंत काम करावे लागत होते. इतकं मोठं दुष्काळाचं संकट या जिल्ह्यात होतं. एक मोठं काम चव्हाण साहेबांनी आपल्या आयुष्यात केलं ते म्हणजे उजनी धरणासंबंधी घेतलेली भूमिका. धरणाचा पाया त्यांनी घातला. नंतर धरण तयार झाले. या जिह्यातील बऱ्याचशा भागात उजनीचे पाणी गेले आहे. ऊस आणि फळबागांमध्ये हा जिल्हा महत्त्वाचा ठरला. माझी खात्री आहे की, या सगळ्या नव्या क्षेत्रात जोमाने पुढे जाण्यासाठी इथला तरुण वर्ग उभा राहिला पाहिजे. एक जुनी पिढी होऊन गेली त्यांनी काम केले, कष्ट केले. दुसरी पिढी आहे जी आज काम करते. आता तिसरी पिढी ही पुढे यायला पाहिजे. तिसऱ्या पिढीने शेतीच्या क्षेत्रात जे बदल होत आहेत त्यांची नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी या भागात केली पाहिजे. हे सूत्र लक्षात ठेवले तर माझी खात्री आहे की तुम्हा सर्वांच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असं शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : महिला परिचरांच्या आंदोलनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष, जद सेक्युलरचा आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -