राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या २१५वर पोहोचली असताना राज्यातले अनेक नेते, सेलिब्रिटी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद
साधला. यावेळी त्यांनी ‘कोरोनाचं संकट गेल्यानंतर येणारा काळ आर्थिक आव्हानांचा असेल. त्यामुळे त्या काळात काटकसरीने वागणं, वायफळ खर्च टाळणं हे आपल्याला करावं लागेल’, असा इशारा दिला आहे. तसेच, लोकांनी घरातच थांबण्याचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.
या संकटातून आपण काय शिकणार?
यावेळी आर्थिक शिस्तीचा धडा शरद पवारांनी लोकांना दिला. ‘आपण या संकटातून जे शिकलो, ते अनुभव इथून पुढच्या जीवनात देखील पाळावे लागतील. आपल्या सवयी बदलाव्या लागतील. आर्थिक संकट समोर उभं आहे. उत्पादन, व्यवसाय असं सगळं बंद आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर देखील होणार आहे. त्यामुळे आपण या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, याचा विचार करायला हवा. वैयक्तिक जीवनात काटकसरीने राहण्याची, वायफळ खर्च टाळण्याची सवय लावावी लागेल. ते केलं नाही, तर पुढचं आर्थिक संकट अधिक गंभीर असेल. विकासाचा दर २ टक्क्यांपर्यंत खाली येणार असेल, तर त्याचे परिणाम विकासावर गंभीर असतील’, असं शरद पवार म्हणाले.

पोलिसांवर कारवाईची वेळ आणू नका
दरम्यान, यावेळी पुन्हा एकदा शरद पवारांनी जनतेला घरातच राहण्याचं आवाहन केलं. ‘अजूनही अनेकजण रस्त्यांवर
विनाकारण फिरताना दिसत आहेत. पण माझी विनंती आहे की पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ आणू नका. एकदा ठरलंय की बाहेर नाही पडायचं, तर नाहीच बाहेर पडायचं. मीसुद्धा घराबाहेर पडलेलो नाही. लोकांना भेटलो नाही. सोशल मीडियावरूनच बोलतोय’, असं ते म्हणाले. तसेच, ‘आपण गर्दी टाळुयात. अजून दोन आठवडे करायला हवं. अजून काही दिवस करावं लागलं, तरी त्याची तयारी असायला हवी’, असं देखील त्यांनी सांगितलं.
डॉक्टरांना केली विनंती…
यावेळी बोलताना शरद पवारांनी स्थानिक दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांना विनंती केली. ‘एक तक्रार माझ्याकडे आली की स्थानिक पातळीवर काही दवाखाने, ओपीडी बंद केले आहेत. मला वाटतं की ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलमधले अनेक सहकारी रात्रंदिवस काम करत आहेत. इतर ठिकाणचे डॉक्टर्स देखील असंच काम करत आहेत. पण काही ठिकाणचे डॉक्टर उलट वर्तन करतात. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या हेतूला धक्का बसत आहे. त्यामुळे माझं आवाहन आहे की डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेऊ नये. अजून दोन आठवडे काढायचे आहेत. तशी उपचार सेवा
रुग्णांना उपलब्ध करून द्या’, असं ते म्हणाले.
Sharad Pawar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 29, 2020