ममता बॅनर्जींच्या मदतीसाठी शरद पवार बंगालमध्ये जाणार

ममता बॅनर्जीं & शरद पवार

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी भाजपकडून संपूर्ण ताकद, यंत्रणा पणाला लावली जात आहे. ममता बॅनर्जी त्यामुळे एकाकी पडल्या असून त्यांच्या मदतीला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये अनेक सभा घेत आहेत. भाजप केंद्र सरकारच्या मदतीने राज्यसरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचत असल्याचे आरोप करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे, अशी माहिती मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम करीत आहे. हा विषय गंभीर असून या विषयासंदर्भात ममता बॅनर्जी व शरद पवार यांची चर्चा झाली. तसेच गरज पडल्यास शरद पवार पश्चिम बंगालमध्येही जातील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार करतील, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.