शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत यंग ब्रिगेड; नेमके कसले संकेत

 

मुंबईः शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहिर केले. शरद पवार यांची ही पत्रकार परिषद अनेक मुद्द्यांनी लक्षवेधी ठरली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या मागे बसलेली यंग ब्रिगेड सर्वांचे लक्ष वेधणारी होती. यामध्ये आमदार रोहित पवार यांची शरद पवार यांच्याकडे असलेली नजर चर्चेचा विषय बनली होती.

रोहित पवार यांच्यासह सक्षणा सलगर, संग्राम जगताप, सोनिया दुहन, आप्पा पाटील व अन्य तरुण कार्यकर्ते शरद पवार यांच्या मागे बसले होते, तर काहीजण उभे होते. शरद पवार यांच्या शेजारी सर्व अनुभवी दिग्गज नेते बसले होते. शरद पवार यांच्या उजवीकडे जयंत पाटील तर डावीकडे प्रफ्फुल पटेल बसले होते. त्यामुळे शेजारी अनुभवी नेते तर पाठिमागे यंग ब्रिगेड अशी मांडणी करुन शरद पवार यांनी नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न केला याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महत्त्वाचे म्हणजे तरुणांना संधी द्यायला हवी. तरुणांनी राजकारणात पुढे यायला हवं. नेतृत्त्व बदलायला हवं, असे अनेक मुद्दे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडले. परिणामी शरद पवार यांची ही पत्रकार परिषद राजकीय विश्लेषकांनाही अचंबित करणारी होती.

शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर या राजीनाम्याला विरोध करणाऱ्यात यंग ब्रिगेड आघाडीवर होती. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. तसेच शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी आग्रहाची मागणी यंग ब्रिगेडने  केली होती. अखेर शरद पवार यांनी राजीनामा घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली.

लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.