घरमहाराष्ट्रपूरग्रस्त भागातील दौरे टाळा शरद पवार यांचे आवाहन

पूरग्रस्त भागातील दौरे टाळा शरद पवार यांचे आवाहन

Subscribe

पूरग्रस्तांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून अडीच कोटींची मदत

राज्यातील पूरग्रस्त भागातील पूर ओसरल्यानंतरही राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. या दौर्‍यांमुळे सरकारी यंत्रणेवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राजकीय नेत्यांना पूरग्रस्त भागातील पाहणी दौरे टाळण्याचे आवाहन केले.

राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करून लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त भागात दौरे करून काम करणार्‍यांचे लक्ष विचलित होईल असे काम करू नये, असे शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले.

- Advertisement -

महापुरामुळे बेघर झालेल्या १६ हजार पीडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २० हजार घरगुती भांडी आणि पांघरूण असे अडीच कोटींचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती देताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी पूरग्रस्त भागात ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशाच नेत्यांनी दौरे करावेत, इतरांनी दौरे करून स्थानिक यंत्रणेचे लक्ष विचलित होईल असे करू नये, असा सल्ला दिला. त्याचवेळी पूरग्रस्तांना अधिक मदत देण्याबाबत राज्य सरकार धोरण जाहीर करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी शरद पवार यांनी लातूर भूंकप पुनर्वसन कार्याची आठवण करून दिली. लातूर भूंकपाच्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव यांना लातूरचा दौरा करायचा होता. मात्र, मी त्यांना दहा दिवस न येण्याची विनंती केली. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तुमच्यासाठी कामाला लागेल, असे सांगितले. माझे ऐकून नरसिंह राव हे दहा दिवसांनंतर दौर्‍यावर आले होते, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

- Advertisement -

राज्यावर अशाप्रकारचे संकट आल्यानंतर मी दौर्‍यावर जात असतो. मात्र, यावेळी मी देखील दौर्‍यावर जाणे मुद्दाम टाळले आहे. आज राज्यपाल पूरग्रस्त भागाच्या दौर्‍यावर जात आहेत. पूरग्रस्तांना उभे करण्यासाठी केंद्राकडून अधिक मदत मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे, असेही पवार म्हणाले.

आम्ही गेल्यावर सरकारी यंत्रणा जागी होते : फडणवीस
पूरग्रस्त भागातील दौरे टाळण्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या आवाहनावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दौरे करताना दौरे करणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्या दौर्‍याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारने तसा आदेश काढलेला आहे; पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते, असे फडणवीस म्हणाले.

…तर मला आनंदच होईल
शरद पवार यांना पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याचवेळी शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील व्यक्ती जर केंद्रात जाणार असेल तर मला आनंदच असेल अशी टिप्पणी शरद पवार यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -