कसब्याच्या निकालानंतर शरद पवारांची भाजपावर तोफ; म्हणाले, देशात बदलाचे वारे!

मुंबई – पोटनिवडणुका आणि विधान परिषदेत भाजपाला अपयशाचा सामना करावा लागला, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीकास्त्र डागलं आहे. देशात बदलाचे वारे वाहतायत. लोकांना देशात सत्ताबदल हवा असल्याचं स्पष्ट दिसतंय, असं शरद पवार म्हणाले. आज सकाळीच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

कसबा पेठ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ होता. भाजपाची तेथील २० वर्षांची सत्ता उलथवून लावण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना यश आलं. यावरून शरद पवारांनी भाजपाला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “नागालँडमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. आम्ही सात जागांवर निवडून आलो आहोत. असं सांगत असतानाच त्यांनी भाजपावरही निशाणा साधला. पोटनिवडणूक आणि विधानपरिषदेत भाजपाला हवं तसं यश मिळालं नाही. त्यांची सत्ता असूनही ते यशस्वी ठरत नाहीयत. ही गोष्ट आगामी बदलांसाठी अनुकूल आहे. देशात बदलाचे वारे आहेत.”

हेही वाचा – जुन्या पेन्शन योजनेसाठी व्यवहार्य तोडगा काढणार

देशात बदलाचा सूर तयार होत आहे. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूमध्ये भाजपा नाही, कर्नाटकमध्ये काँग्रेस होतं, आमदार खासदार फोडले. यामुळे सगळं चित्र दिसयंत ते देशात बदलाचं वारं असल्याचं आहे. त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीत बघायला मिळतील. पोटनिवडणूक, विधान परिषदेत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा नाही, ही गोष्ट आगामी बदलांसाठी अनुकुल आहे, असं शरद पवार म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने त्यांनी सरकारविरोधात आक्रोश केला आहे. शरद पवारांनीही यावरून सरकारला धारेवर धरलं. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही. आमच्याही काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळत नव्हता. पण, त्यावेळी आम्ही स्वतः त्याची खरेदी केली होती. आताही सरकारने नियोजन करायला हवे, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – आनंदाची बातमी : सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता, राज्य सरकारचा निर्णय