Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Sharad Pawar : शरद पवारांचे कमबॅक की, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या...

Sharad Pawar : शरद पवारांचे कमबॅक की, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष?

Subscribe

मुंबई : देशामध्ये आजघडीला सर्वाधिक राजकीय घडामोडी घडत असतील त्या महाराष्ट्रातच. शिवसेनेतील (Shiv Sena) बंडाला एक वर्ष होत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करून शरद पवारांनी (Sharad Pawar) सर्वांनाच धक्का दिला. आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून शरद पवारच कमबॅक करणार की, आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाकरी फिरवण्याची वेळ आली. याबाबत विलंब करून चालणार नाही; भाकरी फिरवली नाही तर ती करपते, असे वक्तव्य शरद पवार यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरीस केले होते. मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित युवा मंथन कार्यक्रमात त्यांनी हे संकेत दिले होते. त्यानंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पद न सोडण्याची गळ घातली. काही जणांचे अश्रू अनावर झाले, गहिवरून आले.

- Advertisement -

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीतील एक गट त्यांच्याबरोबर असल्याचेही सांगितले जात होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातील आजच्या (गुरुवार) अग्रलेखात त्यावरच बोट ठेवले आहे. पवारांच्या चरणाशी लोळण घेणाऱ्यांपैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे. अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? असा सवाल या अग्रलेखात उपस्थित केला आहे.

याआधी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, तेव्हा कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही, असे दोघांकडूनही स्पष्ट करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी जिल्हा स्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, असा तर्क ठाकरे गटाने मांडला आहे.

- Advertisement -

हाच मुद्दा विचारात घेतला तर, कदाचित पक्षातील एका गटाकडून होणारे संभाव्य बंड टाळण्यासाठी शरद पवारांनी हा निर्णय घेतला असावा, असे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. 90च्या दशकात ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षप्रमुख पद सोडत असल्याचे जाहीर केले आणि नंतर कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत, ते पद स्वीकारून पक्षावरील पकड आणखी घट्ट केली होती, त्याप्रमाणे आता एक पाऊल मागे घेऊन पुन्हा अध्यक्षपद स्वीकारून पक्षावरील पकड आणखी घट्ट करण्याचा योजना शरद पवारांची असू शकते. त्याचबरोबर संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे एखादे पद निर्माण करून त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली जाईल आणि आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांना पक्षबांधणी आणि पक्षव्यवस्थापनाचे धडे शरद पवार देऊ शकतात.

याव्यतिरिक्ता, अध्यक्षपद सुप्रिया सुळे यांना देण्यात यावे, असे मानणारा मोठा गटही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यानुसार निर्णय झाला तर, पक्षाची सूत्र सुप्रिया सुळेंकडे राहतील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे पवारांचे विश्वासू नेत्यांची मार्गदर्शन समिती नेमली जाऊ शकते. पवारांनी अध्यक्षपदाची भाकरी फिरवली आहे… आता ती स्वत:च्या की लेकीच्या ताटात टाकणार? हे पाहावे लागेल.

- Advertisment -