राज्यपाल पदावर जबाबदार व्यक्तीची निवड करावी, वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

sharad pawar

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ उठला. राज्यपालांनी विधान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिथेच उपस्थित होते. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. परंतु त्यांनी आज राज्यपालांवर निशाणा साधत राज्यपाल पदावर जबाबदार व्यक्तीची निवड करावी, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवरायांबाबत बोलताना राज्यपालांनी आली मर्यादा सोडली. राज्यपालांच्या या विधानाची राष्ट्रपतींनी दखल घ्यावी आणि राज्यपाल पदावर जबाबदार व्यक्तीची निवड करावी, असं शरद पवार म्हणाले.

राज्यपाल बोलले तेव्हा मी तिथेच होतो. मी आणि गडकरी तिथे असताना त्यांनी जो उल्लेख केला, तो माझ्याबाबत नाही. मात्र गडकरींबाबत केला. या राज्यपालांचं वैशिष्ट्यं म्हणजे अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधानं करणं हा त्यांचा लौकीक आहे, चुकीची विधानं करणं आणि समाजात गैरसमज वाढवण्याची खबरदारी घेणं हेच त्यांचं मिशन आहे का, अशी शंका येते, असंही शरद पवार म्हणाले.

राज्यापाल पदाचा मान ठेवायचा म्हणून मी त्याबाबत अधिक बोलत नाही. शिवछत्रपतींबाबत उल्लेख करून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यामुळे आता राज्यपालांबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी निर्णय घेतला पाहिजे, असंही पवार म्हणाले.


हेही वाचा : कल्याणमध्ये बिबट्याचा थरार, परिसरात उडाली खळबळ